
नामपुर, ता. 19/08/2026 : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, नामपुर येथे प्राचार्य डॉ. यु. बी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शासकीय योजना या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. बी. कदम होते.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून मा. पुनम कोकणे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,

“स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी AMRIT Website म्हणजेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ही महाराष्ट्र शासनाची संस्था महत्त्वाची आहे. राज्यातील तरुणांना संशोधन, कौशल्य विकास व प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
AMRIT पोर्टलवर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना, लघुलेखन प्रशिक्षण योजना, स्किल डेव्हलपमेंट यासारख्या विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध आहे.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कदम म्हणाले की, “राज्यातील तरुण विद्यार्थी व उमेदवारांच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग, रोजगार, ऊर्जा व शिक्षण या क्षेत्रांना प्रोत्साहन देणारी अमृत प्रबोधिनी ही संस्था महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान देत आहे.”
या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. व्ही. दासनूर, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. आर. एस. बागुल, सर्व शिक्षक,विद्यार्थी प्रतिनिधी दामिनी खैरनार व कृष्णा अहिरे व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. एस. सोनवणे यांनी केले तर आभार प्रा. आर. एस. बागुल यांनी मानले.

