
मालेगाव ( प्रतिनिधी )मालेगाव–चाळीसगाव मार्गावरील बोधे फाटा परिसरात एसटी बस आणि आयशर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून त्यांना मालेगाव येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे हे मुंबईहून नाशिककडे येत असताना या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. अपघातस्थळी तातडीने मदतकार्य राबविणे, जखमींना विलंब न करता जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करणे तसेच त्यांना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ना. दादाजी भुसे हे स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून मदत व उपचार कार्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शिवसेना पदाधिकारी श्री. संजय दुसाने, श्री. सुनील माऊली देवरे, श्री. मनोहर बापू बच्छाव, श्री. रामभाऊ मिस्तरी, श्री. निलेश आहेर, श्री. नरेंद्र पवार आदी शिवसैनिक, नगरसेवक तसेच तहसीलदार विशाल सोनवणे यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन जखमींची विचारपूस केली, त्यांच्या उपचारांची माहिती घेतली आणि जखमी व त्यांच्या नातेवाईकांना धीर दिला.
या दुर्दैवी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करण्यात आली.

