
सिन्नर : ( प्रतिनिधी ) मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयात विद्यार्थिनींसाठी पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी तसेच गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा,हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या मंचावर शालेय समितीचे अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे, प्रभारी मुख्याध्यापिका सुवर्णा सोनवणे, कलाशिक्षिका सोनाली मोरे व शिक्षक प्रतिनिधी प्रिया कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय यांनी आपल्या मनोगतात, “आजच्या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या गणेशमूर्तीचीच आपल्या घरात स्थापना करावी,” असे आवाहन केले.त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्वही स्पष्ट केले.कलाशिक्षिका सोनाली मोरे यांनी विद्यार्थिनींना शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.त्यानंतर विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या हाताने आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या.या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नीलिमा दुसाने यांनी केले. कार्यशाळेस दिपक गायकवाड, प्रतिभा वाढवणे यांचे सहकार्य लाभले.कार्यशाळेला ९०विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

