
मोहाडी (ता. दिंडोरी) : महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अनाथ बालकांचे संगोपन, पुनर्वसन तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. मात्र, आजही समाजातील अनेक प्रश्न कायम असल्याने महात्मा फुलेंच्या विचारांची आणि कार्याची आज पूर्वीइतकीच गरज आहे आणि त्यामुळेच आपण महात्मा फुलेंचे फक्त विचार न ऐकता त्यांचे विचार कृतीत आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संशोधक व लेखक हेरंब कुलकर्णी यांनी केले.मोहाडी येथील गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन संयोजित ७१ व्या श्रीकृष्ण व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘महात्मा फुले आजच्या संदर्भात’ या विषयावर गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे होते.पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले की, महात्मा फुले यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार, वंचित घटकांसाठी केलेले कार्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मांडलेले विचार आजही मार्गदर्शक आहेत. विशेषतः वंचित घटक आणि एकल मातांच्या मुलांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याची जबाबदारी आजच्या शिक्षण संस्थां व समाजातील सक्षम घटकांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.मोहाडीसारख्या ग्रामीण भागात गेली ७१ वर्षे अखंडपणे सुरू असलेली श्रीकृष्ण व्याख्यानमाला ही समाजप्रबोधनाची अनुकरणीय परंपरा आहे, असे कौतुकही कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरेंसह व्याख्याते हेरंब कुलकर्णी यांनी केले.हे व्याख्यान ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता म्हणून कै. अरुणराव यशवंत मोगरे यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात आले होते.यावेळी पिंपळगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश मोरे, भाजप ग्रामीणचे उपाध्यक्ष बापूसाहेब पाटील, कादवा संचालक शहाजी सोमवंशी, मविप्र संचालक प्रवीण जाधव, पुणे द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक सुरेश कळमकर, विलास पाटील, वसंतराव मनकर ,विजय पोखरकर, सयाजी पोखरकर, बबनराव तिकांडे, उपसरपंच भाग्यश्री जाधव, उत्तमराव जाधव, नितीन मोगरे, मनोज मोगरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी के. आर. टी. हायस्कूलच्या गीतमंचाने स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. आयोजकांच्या वतीने दहावी, बारावी व आयटीआयमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख यांना सार्वजनिक वाचनालय, नाशिकचा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने गौरविण्यात आले.कार्यक्रमास मोहाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विलासराव देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन धनंजय वानले यांनी, तर आभार प्रा. धनंजय देशमुख यांनी मानले.छायाचित्र : मोहाडी येथील श्रीकृष्ण व्याख्यानमालेत ‘महात्मा फुले आजच्या संदर्भात’ या विषयावर मार्गदर्शन करताना संशोधक हेरंब कुलकर्णी. समवेत मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व मान्यवर.

