नाशिकरोड:- (प्रतिनिधी ) "सभोवतालचा निसर्ग आणि आपली परिस्थिती आपल्याला धैर्य, चेतना, स्वावलंबन शिकवत असते. मनात साचलेलं दुःख, वेदना आणि वेगवेगळ्या भावना मांडण्यासाठी साहित्याची नितांत गरज असते. म्हणजेच साहित्य म्हणजे अंत:करणातील भावनांचे प्रकट शब्दरूप आहे" असे प्रतिपादन महानुभाव पंथाचे व्यासंगी अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक प्रा.बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. ऋतुरंग सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोडचे अध्यक्ष उन्मेष गायधनी यांच्या मार्शनाखाली संपन्न झालेल्या 'संवाद सृजनाशी' या मालिकेच्या दुसऱ्या पर्वातील चाळीसावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. शाखेचे अध्यक्ष तथा शाखेचे उपाध्यक्ष कवी रवींद्र मालुंजकर यांच्या हस्ते वक्ते प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला.
प्रा.अंजनगावकर पुढे म्हणाले की, "निफाड तालुक्यातील दात्याने हे माझे मूळगाव. एक वर्षाचा असताना मला कुटुंबीयांनी कृष्णार्पण केलं. साध्वी मनुबाई अंजनगावकर यांच्या मार्गदर्शनाने आजपर्यंत वाटचाल सुरू आहे. बालपणापासून झालेल्या समतेच्या संस्कारांचे प्रतिबिंब साहित्यात उमटले. चक्रधर स्वामींचे समतेचे विचार सांगणारा महानुभाव पंथ हा खऱ्या अर्थाने साहित्य संप्रदाय आहे. ओझरच्या नवीन इंग्रजी शाळेत शिकताना देशदूतचे तत्कालीन संपादक शशिकांत टेंबे यांनी आमच्या शाळेच्या 'मृदगंध' हस्तलिखित्ताच्या संपादनाबद्दल मार्गदर्शन केल्याने माझ्यातला संपादक घडला. नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयात प्राचार्य प्र. दा. राजदेरकर, ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत वर्तक, प.पू. महंत डॉ. नागराजबाबा, संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. यू. म. पठाण, डॉ. ब्रह्मानंद देशपांडे, डॉ. वि. भि. कोलते अशा दिग्गजांनी केलेल्या मार्गदर्शनाने मी साहित्यनिर्मितीसह संपादन क्षेत्रात कार्य केले. बिटको महाविद्यालयात ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना बोलावून त्यांच्या कविता आणि मार्गदर्शन घडवून आणले. मराठी साहित्यनिर्मितीत महानुभाव पंथाचे योगदान अनन्यसाधारण असून मराठी ही संजीवन भाषा आहे. माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांच्या उपस्थितीत दिल्लीला संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची अमूल्य संधी मिळाली. नाशिकरोड मसाप शाखेने केलेल्या उत्तुंग कार्याची जाणीव शासनाने ठेवत शाखेला भूखंड प्रदान केला आहे, याचा आनंद व्यक्त करून नाशिकसह नाशिकरोड हेही स्वतंत्र शहर आहे. त्यालाही स्वतंत्र इतिहास आहे. या नाशिकरोडवर स्वतंत्रपणे लिहायला हवं,"अशी अपेक्षा व्यक्त केली.
माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, दयाराम गुंजाळ, संजय पागेरे, मनोज गायकवाड, उद्देश शेवाळे, दिगंबर रोडे, प्रा.गोविंद माळी, विष्णुपंत गायखे, अरुण खुळे, महेंद्र मराठे, सुरेंद्र कपोते, अजित पवार, सुमन हिरे, रामचंद्र शिंदे, प्रमुख कार्यवाह शिवाजी म्हस्के, कार्यवाह रेखा पाटील, सल्लागार समिती सदस्य प्रशांत कापसे आदींसह रसिक उपस्थित होते. कार्यकारणी सदस्या कामिनी तनपुरे यांनी सादर केलेल्या स्वागतकाव्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. अतिथींचा परिचय कांचन पवार यांनी करून दिला. अलका अमृतकर यांनी आभार मानले. कोषाध्यक्ष दशरथ लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.