नाशिकरोड:( प्रतिनिधी )- माजी विद्यार्थी शाळेची संपत्ती असतात. शाळेला भेट देताना कधीतरी त्यांच्या मनात जुन्या आठवणी दाटून येतात. आपली शाळा, परिसर, गुरुजन आणि शिकत असताना घडलेल्या गमतीजमती यांना उजाळा मिळत असतो. असा उजाळा देत शिक्षक दिनाच्या निमित्ताने पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालय आणि आदर्श प्राथमिक विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता जपली.
शाळेचे माजी विद्यार्थी आणि युवा उद्योजक ज्ञानेश्वर सानप यांच्या पुढाकाराने गुरुजनांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचा उपक्रम संपन्न झाला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर सानप, पालक मनीषा सानप, मदन गिते, विशाल सानप यांच्या उपस्थितीत यंदाचा शिक्षक दिन अविस्मरणीय ठरला. यावेळी नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक अरुण पगार, आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक चंद्रकांत खाणकरी यांच्यासह सर्व शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संयोजकांनी गुरुजनांचा लेखणी आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते नववीपर्यंतच्या वर्गांना अध्यापन करत शिक्षक म्हणून शिकविण्याचा अनुभव घेतला. प्रमुख पाहुणे सुधाकर गोडसे यांनी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन गुरुजनांप्रति व्यक्त केलेला आदर हा सर्वांसाठी अनुकरणीय असल्याचे सांगितले. तर शिक्षक व्ही.ए.पाटील, संयोजक ज्ञानेश्वर सानप यांनी मनोगत व्यक्त केले. गोपालकाला उत्सवानिमित्त आयोजित दहीहंडी उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अक्षय सानप, करण सानप, अनिल सानप, ऋषिकेश सानप, तेजस सानप यांच्यासह आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक-कर्मचारीवृंद यांनी संयोजन केले. शिक्षक कैलास लहांगे आणि रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.