
१९ वर्षे शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पहिले तीन क्रमांक मिळविणारे खेळाडू
नाशिक, दि. ७ सप्टेंबर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वतीने आयोजित १९ वर्षे मुलींच्या शालेय बॅडमिंटन स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या नाशिकरोड च्या बिटको महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयामुळे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. आज पार पडलेल्या या शालेय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिक शहरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोडच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सांघिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत विजेतेपद मिळविले. बी.वाय.के. महाविद्यालयाने द्वितीय, तर एच.पी.टी. व आर.वाय.के. महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, सहसचिव डॉ. विष्णू एन. सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. भट मॅडम, प्राचार्य डॉ.अवस्थी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे, व्यवस्थापन प्रमुख शैलेश गोसावी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशासाठी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुरेश कोकाटे, योगेश शिंदे आणि कुणाल महाजन तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे. विभागीय स्पर्धेतही हे खेळाडू उत्तम कामगिरी करतील असा विश्वास क्रीडा शिक्षक योगेश शिंदे यांनी व्यक्त केला.

