
नांदगाव ( प्रतिनिधी)दि. ११ सप्टेंबर २०२६.नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच त्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देणे या उद्देशाने करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शाडू मातीपासून आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनविण्याचे मार्गदर्शन कला शिक्षक निलेश पाटील सर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर व कल्पक गणेशमूर्ती तयार केल्या.

यावेळी विद्यार्थ्यांनी “पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया आणि शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करूया” असा संदेश दिला.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन श्री. सुनीलकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष सुशिलभाऊ कासलीवाल, सेक्रेटरी श्री. विजय चोपडा, सौ. प्रमिलाताई कासलीवाल, श्री. जुगलकिशोरजी अग्रवाल, श्री. रिखबचंद कासलीवाल, श्री. महेंद्र चांदीवाल आणि प्रिन्सिपल श्री. मनी चावला यांनी कौतुक केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करत त्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. पर्यावरणाचे संवर्धन करत गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे ही कार्यशाळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली.

