
नाशिक ..शब्दांची मांदियाळी, भावभावनांचा मेळ आणि टाळ्यांचा कडकडाटासह रंगलेला काव्यमेळावा आज नाशिकच्या नारायण सुर्वे वाचनालयाच्या काव्यकट्ट्यावर आनंदात साजरा झाला. कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय आयोजित केलेल्या 123 व्या कवी संमेलनाने नाशिककर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून 30 हून अधिक नवोदित आणि नामवंत कवींनी या संमेलनात हजेरी लावत आपल्या कवितेंचा ठेवा रसिकांसमोर मांडला.
मन उधाणले फार
खोल अंतराला जाळी
गेली निघून सासरी
माझी गुलाबाची कळी
या त्यांच्या कवितेने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले.अनेक जुन्या नव्या कवितेंचा मेळ घालत त्यांनी उपस्थिताना खिळवून ठेवले.
या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे भूषण, राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित आदर्श शिक्षक, सुप्रसिद्ध व्याख्याते आणि ‘उठा, तुम्हीही जिंकणारच’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या प्रेरणादायी ग्रंथाचे लेखक श्री. अशोक कुमावत होते.
कवींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, कविता चार भिंतीत बसून कागदावर उतरविता येत नाहीत तर त्या शेताच्या बांधावर,नदीच्या काठावर, गर्द हिरव्या झाडीच्या वनराईत,वेदनेच्या खोल डोहात बुडाल्यावर अंतर्मनातून काळजातील शब्दांच्या माध्यमातून ऱ्हुदयांत कोरल्या जातात.लिहिणारे लाखो आहेत, पण लोकांच्या हृदयावर कोरली जाणारी कविता लिहिणारे हाताच्या बोटावर आहेत. कविता ही कुठल्याही प्रयोगशाळेत बनत नाही, ती जगण्याच्या संघर्षातून जन्म घेते.

कविता कशी असावी, याचे सर्मपक उदाहरण देत ते म्हणाले . कवितेला मातीचा गंध असावा, शब्दांना धार असावी तलवारीची आणि आशयाला उंची असावी आकाशाची, तरच ती कविता इतिहासात अमर होते.
त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.या संमेलनाचे उद्घाटन नाशिकचे प्रसिद्ध युवा कवी माणिकराव गोडसे यांनी केले.त्यांनी कविता कशी असावी या विषयावर विविध दाखले देवून स्पष्टीकरण केले. व्यासपीठावर वाचनालयाचे व कविकट्ट्याचे समन्वयक रविकांत शार्दुल होते.
कवयित्री रेखाताई सोनवणे यांनी आपल्या खुमासदार आणि ओघवत्या सूत्रसंचालनाने संपूर्ण कार्यक्रमात उत्साह टिकवून ठेवला. सर्व उपस्थित कवींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या व्यासपीठावर गझलकार निशांत गुरु,कवी रंजन कापडणीस ,डॉ.प्रशांत आंबरे,कवी अरुण घोडेराव,बहिरु गामणे ,आकाश पगार आदी उपस्थित होते.

