
नाशिक ( प्रतिनिधी ): क्रीडा संघटक हेमंत पांडे यांच्या वाढदिवसा निमित्त नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन आणि रामभूमी बहुउद्देशीय मंडळ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या दिंडोरी रोड, म्हसरूळ येथील जीवन स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेज येथे १७ वर्षे वयोगटाच्या कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हेमंत पांडे यांचे ॲथलेटिक्स आणि ब्रीज या खेळामध्ये मोठे योगदान आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन या संस्थेचे प्राचार्य बाळासाहेब घुले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ओझर नगरपालिकेचे नगरसेवक अशोक कदम, छत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे, क्रीडा संघटक दीपक निकम, राजेंद्र प्रधान, भूषण भटाटे, यश अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत जिल्ह्यातून १०२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
यावेळी बोलतांना प्राचार्य घुले यांनी सांगतले की, खेळाडूंना संधी मिळावी यासाठी आमच्या संस्थेच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सहकार्य केले जात आहे. त्यामुळे खेळाडूंनी संघाचा फायदा घेऊन प्रगती करावी असे सांगतले. यावेळी अशोक कदम आणि आनंद खरे यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनानंतर सामन्यांना सुरवात झाली.

मुलींच्या गटात अटीतटीच्या खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात एल. व्ही. एच. पंचवटी कॉलेजची राज्यस्तरीय खेळाडू गौरी तेलगडने आपली सहकारी पुष्पावती रुंगठा शाळेची खेळाडू प्राची मनवर हीचा पराभव करून विजेतेपद मिळविले. बी. वाय. के. कॉलेज च्या दिशाली बलदवाने तिसरा तर उंटवडीच्या इंग्लिश मिडीयम स्कुलची खेळाडू वैभवी चिंताकिंदीने चवथा क्रमांक मिळविला.
मुलांच्या गटात सदानंद गवई आणि कृष्णा तेलगड यांच्यात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सदानंद गवई याने पहिला सेट ०६- १५ असा गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र प्रथमपासून आघाडी घेत दुसरा सेट १३ – ०२ असा जिंकून बरोबरी साधली. तर तिसऱ्या सेटमध्येही सदानंद याने हीच लय कायम राखत तिसरा सेट १६ – ०९ असा जिंकून मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले.रुंगठा शाळेच्या स्वामी धात्रक याने तिसरा तर के. टी. एच. एम. चा खेळाडू श्रीराज कुमावत याने चवथा क्रमांक मिळविला. विजेत्यां खेळाडूंना मेडल्स आणि प्राविण्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

