
मूळडोंगरी : ( प्रतिनिधी ) सरस्वती माध्यमिक विद्यालय, मूळडोंगरी येथे श्री गणेश चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
विद्यालयात गणरायाची सुंदर सजावट करून विधिवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. ढोल-ताशांच्या गजरात व उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सवांचे महत्त्व समजावून देण्यात आले. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

