
वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी: केडगाव चौफुला (ता. दौंड ) येथे महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमीनधारक, पुजारी, अर्चक, सेवाधारी आणि भोगवटादार वर्ग-३च्या हक्कांच्या प्रश्नासाठी श्री बोरमालनाथ देवस्थान परिसरात आयोजित देवस्थान इनाम कृती समितीच्या राज्यस्तरीय विराट महाअधिवेशनाला महाराष्ट्राच्या विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः सिन्नर व संगमनेर तालुक्यातील देवस्थान इनामधारक, समाजबांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्कांच्या लढ्याला पाठिंबा दिला.
महाअधिवेशनाचा शुभारंभ स्वागतगीत, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाला. अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके, ओमप्रकाश गिरी, ॲड. राजेंद्र बन, दत्तात्रय गिरी महाराज, ॲड. विश्वजीत देशपांडे, अनुप गोसावी (नाशिक), सिन्नर तालुका सरचिटणीस वसंत गोसावी, सूर्यभान गोसावी (नाशिक), सूर्यकांत गिरी, प्रकाश गोसावी, पंडित गोसावी (पुणे), मुन्नागिरी गोसावी (पंढरपूर), धन्यकुमार पुरी पाटील (धाराशिव) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वसंत गोसावी यांचे संघटित होत लढ्याचे आवाहन
करताना सर्व धर्मीय पुजारी व इनामधारकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी पुढाकार घेतलेल्या आयोजकांचे आभार मानले. देवस्थान इनाम जमीन हा केवळ एका समाजाचा प्रश्न नसून अनेक पिढ्यांच्या उपजीविकेशी, धार्मिक परंपरांशी आणि हक्कांशी संबंधित प्रश्न असल्याचे सांगत त्यांनी सर्व समाजांनी एकजुटीने आणि कायदेशीर मार्गाने या प्रश्नासाठी संघटित होण्याचे आवाहन केले.
आमदार रत्नाकरकाका गुंदे यांनी दूरध्वनीद्वारे महाअधिवेशनाशी संपर्क साधून देवस्थान इनामधारकांचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असल्याचे नमूद केले. देवस्थान इनाम जमीन भोगवटादार वर्ग-३चे हक्क पूर्ववत मिळवून देण्यासाठी संघटित आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही त्यांनी दिली.
दशनाम गोसावी समाज परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश गिरी यांनी इनामधारकांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडत सर्व समाजबांधवांनी संघटित होण्याचे आवाहन केले. अन्यायाविरुद्ध संघटित प्रत्युत्तर देण्यासाठी आवाहन केले.
आंदोलनाचे कायदेशीर अभ्यासक ॲड. राजेंद्र बन यांनी या प्रश्नाची कायदेशीर बाजू, न्यायालयीन व प्रशासकीय लढ्याचे महत्त्व तसेच संघटनेची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
परशुराम सेवा संघाचे नेते ॲड. विश्वजीत देशपांडे यांनी इनाम जमिनीचा इतिहास आणि विविध कायदेशीर बाबींवर अभ्यासपूर्ण विवेचन केले.
मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा
अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब शिंदे यांनी देवस्थान इनामधारकांच्या प्रश्नावर शासनाने गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली. आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकाऱ्यांसह सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी मुंबईत ५० जणांचे तीव्र आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देवस्थान इनामधारकांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला. आपल्या रास्त मागण्यांसाठी सर्वांनी सामूहिकरीत्या संघटित होऊन मुंबईत जाण्याची गरज व्यक्त करत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विशेष प्रयत्न करण्याची आणि या लढ्यात सोबत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. या
महाअधिवेशनात संदीप गोसावी, पंकज गोसावी (पुणे), सिन्नर तालुका माजी अध्यक्ष रतनपुरी गोसावी, उत्तम गोसावी, दिलीप गोसावी, सोमनाथ गोसावी, बाळपुरी गोसावी, कैलास गोसावी, संगमनेर तालुका अध्यक्ष माधव विठ्ठलपुरी गोसावी, दिनेश गोसावी, चंद्रकांत रामगिरी गोसावी, शंकर रामगिरी गोसावी, माधव रामगिरी गोसावी, भगवान देवगिरी गोसावी, हरिश्चंद्र दगडू गिरी, सुनील सुधाकर गिरी, बाळासाहेब गोविंद गिरी, बाळासाहेब रामगिरी गोसावी आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून देवस्थान इनामधारक, गुरव-पुजारी, ब्राह्मण, गिरी, गोसावी, बैरागी, मुस्लिम काझी यांसह विविध समाजांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे केडगाव चौफुला येथे झालेल्या या महाअधिवेशनातून देवस्थान इनामधारकांच्या प्रश्नासाठी विविध समाजांची एकजूट आणि व्यापक संघटित लढ्याचा निर्धार अधोरेखित झाला.

