
नाशिक ता: १५ ( मु. पो. गिरणा गौरव वृत्तसेवा) राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साबरदरा येथे *वाचन प्रेरणा दिन* उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनात पुस्तकांविषयी प्रेम निर्माण व्हावे, वाचनाची गोडी वाढावी आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साबरदरा येथे भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.वाचन हे केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देणारे, कल्पनाशक्तीला चालना देणारे आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देणारे प्रभावी माध्यम आहे. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या वापरासोबतच पुस्तकांच्या सहवासात अधिक वेळ घालवावा, नियमित वाचनाची सवय जोपासावी आणि ज्ञानाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या बुद्धिमत्तेच्या, परिश्रमाच्या आणि जिद्दीच्या बळावर देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली. त्यांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. मोठी स्वप्ने पाहणे, त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःबरोबरच समाज व देशाच्या प्रगतीत योगदान देणे, हा त्यांच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या जयंतीनिमित्त पोहोचविण्यात आला.या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये गोष्टींची पुस्तके, चरित्रग्रंथ, बालसाहित्य, ज्ञानवर्धक पुस्तके आणि प्रेरणादायी साहित्य वाचण्याची आवड निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वाचनामुळे शब्दसंग्रह समृद्ध होतो, भाषिक कौशल्ये विकसित होतात, आकलनशक्ती वाढते आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज काही वेळ वाचनासाठी राखून ठेवावा, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.‘ *एक पुस्तक, एक नवी दिशा; एक वाचन, ज्ञानाचा नवा प्रवास!’* या विचारातून शाळेत वाचन संस्कृती रुजविण्याचा संकल्प करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. कृष्णा हरी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपशिक्षिका श्रीमती ज्योती भोये यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगत पुस्तकांशी मैत्री करण्याची प्रेरणा दिली.

