
नांदगाव :(प्रतिनिधी )गणेशोत्सव तसेच सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून मराठा विद्या प्रसारक समाजाचे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव येथे विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
दि. १४ सप्टेंबर २०२६ ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, नाटक स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम, शारीरिक कसरती, वाद्यवादन, काव्यवाचन तसेच वैयक्तिक कलाविष्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविणाऱ्या प्रशिक्षणार्थींना तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांच्या कलागुणांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेचे संचालक इंजि.अमित उमेदसिंग बोरसे-पाटील, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील विश्वनाथ बोरसे, ज्येष्ठ सभासद व स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य निवृत्ती हरीभाऊ खालकर, अरविंद चिमणराव बोरसे,रामनाथ रघुनाथ गायकवाड, नितीन वसंतराव आहेर, राजेश यशवंत पाटील तसेच न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
औ.प्र.संस्थेत वर्षभरात होणाऱ्या विविध उपक्रम तसेच गणेशोत्सव व सेवा संकल्प अभियान यांचा समन्वय साधून शाखेत राबवलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती प्रास्ताविकातून संस्थेचे प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे यांनी दिली.तर शाखेतील वरीष्ठ निदेशक राजेंद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक इंजि. अमित उमेदसिंग बोरसे-पाटील होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी प्रशिक्षणार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक शिक्षणापुरते मर्यादित न राहता आपल्यातील कला, कौशल्ये, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच संस्थेने प्रवेश प्रक्रियेत १०० टक्के प्रवेशाचे उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल त्यांनी शाखेचे विशेष कौतुक केले.
या गुणगौरव सोहळ्यामुळे प्रशिक्षणार्थींना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन मिळून भविष्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी फक्त तांत्रिक क्षेत्रात निपुण नसून सांस्कृतिक क्षेत्रात देखील इतरांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदवू शकतात हे सिद्ध झाल्याचे विषद केले.
भविष्यात या सर्व प्रशिक्षणार्थींना आवश्यक सर्व सोयी सुविधा अजून जास्तीत जास्त प्रमाणात कशा उपलब्ध करून देता येतील यासाठी मी प्रयत्नशील राहील असे सांगितले. त्याचप्रमाणे औ.प्र.संस्थेतील सध्या शिक्षण घेत असलेल्या तसेच यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या परंतु रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी संस्थेच्या कर्मवीर बाबुराव ठाकरे प्लेसमेंट सेंटरच्या माध्यमातून भव्यदिव्य असा रोजगार मेळावा लवकरात लवकर नांदगाव शहरात घेण्याचा माणस व्यक्त केला. औ.प्र.संस्थेने गणेशोत्सव तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत अतिशय स्तुत्य उपक्रम राबवल्या बद्दल समाधान आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निदेशक धनराज काकळीज व निदेशिका सुवर्णा भड यांनी केले, तर आभार प्रदर्शन निदेशक सागर बोरसे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व निदेशक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले

