
लेखन – अशोक लक्ष्मण कुमावत राष्ट्रपती पुरस्कार विजेते ,लेखक, कवी ,प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते, सूत्रसंचालक. नासिक
आज १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन . डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती शिवाय कविवर्य नारायण सुर्वे यांची जयंती त्या निमित्त समाजाने ज्याला खोडकर,फुटकळ,वेंधळा,बिनकामाचा ठरवलं ,स्वतःच्या आईनेच ज्याला जगण्यासाठी नाकारलं फुटपाथवरून विद्यापीठापर्यंत लिहिलेल्या कवी नारायण सुर्वे यांच्या जीवनात आज आपण जरा डोकावून बघूया.
आजच्या दिवशी, म्हणजे १५ ऑक्टोबर १९२६ एक काळीज हेलावून टाकणारी घटना घडली.एक बाळ जन्माला आले, ज्याच्या नशिबात ना घर होते, ना दार. ना सगे सोयरे ना गणगोत. जन्मदात्या आईनेच पोटच्या गोळ्याला रस्त्यावर फेकून दिले. सुगरणीला खोपा लाभावा तसे फक्त अनाथालय, फुटपाथ, वांद्रेच्या वाड्या ,गटारी हेच त्याचे पाळणाघर. त्या जन्माने दुर्दैवी पण कर्माने सटवायीच्या लेखणीवर टिच्चून काळाच्या पडद्यावर नाव कोरणारे नारायण गंगाराम सुर्वे.
गंगाराम सुर्वे नावाच्या गिरणी कामगाराने त्याला उचलले, म्हणून तो नारायण गंगाराम सुर्वे झाला. नाहीतर त्याचा कुठलाच धर्म नव्हता, कुठलीच जात नव्हती. फुटपाथ हेच त्याचे घर होते आणि मुंबईची धूळ हीच त्याची शाल होती.
आज जेव्हा आपण ‘माझे विद्यापीठ’ वाचतो, तेव्हा ते विद्यापीठ कुठले?
नाशिकच्या , मुंबई किंवा पुण्याच्या इमारतीतले नाही,
तर दादरच्या पुलाखालच्या मुलांचे, हॉटेलात कपबशा घासणाऱ्या पोरांचे विद्यापीठ.
हॉटेलात वेटर, गिरणीत झाडूवाला, शाळेत शिपाई, पेपर विकणारा, घोड्यांचे शेण काढणारा नालबंदाचा मदतनीस – सातवी पास झालेला हा पोरगा शिकला कुठे? रस्त्यावरच्या खांबावरच्या जाहिराती वाचून, भिंतीवरच्या बाराखडी वाचून. स्वतःच्या हिमतीवर तो लिहिता-वाचता झाला. १९६२ ला त्याचा पहिला स्फोट झाला – “ऐसा गा मी ब्रह्म”मराठी कवितेच्या गाभाऱ्यात तो फुटपाथवरचा माणूस घुसला.
नारायण सुर्वे आज असते तर काय म्हणाले असते?
आज औद्योगिक क्षेत्र बघा. सुर्वेंच्या काळात गिरण्या होत्या, संप होते, लाल बावटा होता. कामगार म्हणायचा –
“माझ्या हातावर पोट आहे, पण हातात हत्यारही आहे!”
आज काय परिस्थिती आहे?
कामगारांची संख्या फक्त घटली नाही,तर माणुसकी घटली:
पूर्वी ५००० कामगार असलेल्या कंपनीत आता ५०० कामगार आणि ४५०० कंत्राटी. कंपनीच्या गेटवर लिहिलेले असते – “We are family”. आत गेल्यावर कळते, कुटुंबातही आता ठेकेदारी आली आहे. कायम कामगार संपला, कंत्राटी माणूस आला. त्याला PF नाही, संपावर जाण्याचा अधिकार नाही. तो फक्त बारकोड आहे.
सुर्वे म्हणाले होते –
“दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दिवस दुष्काळात गेले…”
आजचा कंत्राटी कामगार म्हणतोय – दोन दिवस कंपनीच्या गेटवर उभे राहण्यात गेले, दोन दिवस कंत्राटदाराच्या दारात गेले.
आंदोलने दाबली कशी जातात?
पूर्वी लाठीचार्ज व्हायचा, आता लाईफचार्ज होतो. संप केला की थेट WhatsApp वर मेसेज – “You are terminated due to performance issue.” कामगार संघटनेचा नेता बोलला की दुसऱ्या दिवशी त्याची बदली गुजरातला, तामिळनाडूला. भीतीचे वातावरण एवढे की संपाची नोटीसही आता कोणी देत नाही.
सुर्वेंच्या काळात याकूब नालबंदवाला होता, आफ्रिकन चाचा होता. जो म्हणायचा – “हमारा खून जिंदाबाद!” आजचा आफ्रिकन चाचा CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
उद्योजक संस्थानिक झाले:
पूर्वी मालक कारखानदार होता, आता तो संस्थानिक आहे. कामगार संघटना त्याच्या दरबारातली मांडलिक झाली आहे. वार्षिक अधिवेशनात मालकाच्या फोटोला हार घालणारी संघटना, म्हणजे संघटना राहिली का? मालक म्हणतो – “कामगारांनी समजून घेतले पाहिजे.” पण मालकाने कधी कामगाराची झोपडी समजून घेतली का?
यावर मिर्झा गालिबचा शेर आठवतो –
“न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता,
डुबोया मुझको होने ने, न होता मैं तो क्या होता!”
आजचा कामगार स्वतःच्या असण्यानेच बुडाला आहे.
सुर्वेंचे अबाधित स्थान आणि झालेली अवहेलना
मराठी साहित्य विश्वात सुर्वे म्हणजे बंड. पण आपण त्यांना काय दिले?
दादर पुलाखालची मुले ही कादंबरी वाचून आपण हळहळलो, पण पुलाखालची मुले आजही तिथेच आहेत. फक्त आता त्यांच्या हातात भीकेचा कटोरा नाही, मोबाईल आहे.
सुर्वेंना आपण ‘कामगार कवी’ म्हणून एका कप्प्यात बंद केले. ते फक्त कामगारांचे नव्हते, ते माणसाचे कवी होते. त्यांनी लिहिले –
“सनद – मी एक कामगार, माझ्या हातात आहे सनद,
या पृथ्वीवर माझ्या घामाचा हक्क आहे!”__
ही सनद आज कोण मानतो? बिल्डरने गिरणीची जमीन घेतली, टॉवर बांधला, त्यात सुर्वेंच्या नावाची साधी लायब्ररीही नाही.
त्यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी ‘मास्तरांची सावली’ लिहिले. त्या सावलीत आजही हजारो शिक्षक, कामगार जगत आहेत.
आजच्या तरुणासाठी सुर्वे म्हणजे काय?
आजचा तरुण MPSC, UPSC करतो, पण नोकरी मिळाली की पहिला प्रश्न – “संपात जाऊ नकोस, बदली होईल.” ही भीती सुर्वेंना नव्हती. ते म्हणायचे –
” भेटला हरेक रंगात माणूस,पिता, मित्र, कधी नागवणारा होऊन,
रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत पायाचे तळवे होरपळून!”
आजच्या AC ऑफिसमधल्या तरुणाला हा तवा माहितच नाही. म्हणून तो सुर्वे वाचत नाही.
शेवटी एकच सांगावेसे वाटते, सुर्वेंच्या शब्दात –
” आता आलोच आहे जगात, वावरतो आहे ह्या उघड्यानागड्या वास्तवात,
जगायलाच हवे, आपलेसे करायलाच हवे, कधी दोन घेत, कधी दोन देत.”
आज नारायण सुर्वे असते तर त्यांनी पुन्हा फुटपाथवरच कविता लिहिली असती. कारण कविता महालात जन्माला येत नाही, ती घामातून जन्माला येते.
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच कवितेला सलाम –
“माझे विद्यापीठ मजला शिकवीत आहे,
रस्त्यावरल्या शाळेतून…”.
आणि ही शाळा कधीच बंद होणार नाही, जोपर्यंत एकही माणूस फुटपाथवर झोपला आहे!
एका फुटपाथवरच्या कवीला, फुटपाथवरचाच मानाचा मुजरा!
लेखक
अशोक लक्ष्मण कुमावत
राष्ट्रपती पुरस्कार विजेते
नाशिक
9881856327

