
नांदगाव, प्रतिनिधी : येवला–नांदगाव महामार्गावरील सोमठाणे घाटात मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. मध्य प्रदेशातील एका खाजगी लक्झरी बसचा चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ ते ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ही खाजगी लक्झरी बस सुमारे २५ ते ३० प्रवाशांना घेऊन प्रवास करत होती. सोमठाणे घाटातील जोश घाट परिसरातून बस जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस रस्त्यावरच उलटली. अपघात होताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रवाशांच्या आर्त किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातामुळे बस रस्त्याच्या मधोमध आडवी झाल्याने येवला–नांदगाव महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला करण्यात आली आणि वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चालकाचे नियंत्रण का सुटले, याचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

