
वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी.
पाटोळे (ता. सिन्नर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या त्यागाचे स्मरण करून विद्यार्थ्यांना देशभक्ती, सामाजिक एकोपा आणि आदिवासी समाजाच्या गौरवशाली योगदानाची माहिती देण्यात आली. स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. आदिवासी समाजाच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी सैनिक हंसराज आव्हाड व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पांडुरंग सांगळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक केशव खताळे, मिननाथ खताळे, दत्तू आंधळे, तसेच तुकाराम सांगळे, विष्णू सांगळे, संजय कराड, योगेश बैरागी आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’चा निर्धार व्यक्त केला आणि भारत छोडो आंदोलनाला निर्णायक सुरुवात झाली. या आंदोलनाने स्वातंत्र्यलढ्याला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप दिले. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंगवास, लाठीमार आणि विविध प्रकारच्या यातना सहन करून स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली. त्यामुळे ९ ऑगस्ट हा दिवस ‘ऑगस्ट क्रांती दिन’ म्हणून स्मरणात ठेवला जातो.
याच दिवशी जागतिक आदिवासी दिन देखील साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी लोकांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून निश्चित केला आहे. आदिवासी समाजाने भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. बिरसा मुंडा यांच्यासह अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला, असेही मुख्याध्यापकांनी सांगितले.तसेच ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत आपल्या घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्य, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करावी, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, स्वातंत्र्याचा इतिहास, आदिवासी संस्कृतीचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानिक मूल्ये याबाबत जागृती करण्यात आली.
‘स्वातंत्र्य हे केवळ मिळवलेले वैभव नसून, ते जपण्याची जबाबदारीही प्रत्येक नागरिकाची आहे,’ हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

