नाशिकरोड:( प्रतिनिधी)- शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेने नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाच्या 'दातृत्वाचा ज्ञानयज्ञ' उपक्रमाला भरघोस मदत करत आपल्या दातृत्वाचा अनोखा वसा सलग दुसऱ्या वर्षीही जपला.
स्वानंद जेष्ठ नागरिक संस्था ही जिल्ह्यातील सेवाभावी आणि उपक्रमशील संस्था आहे. संस्थाध्यक्ष जयराम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी पदाधिकारी आणि सभासद विविध व्याख्याने, मनोरंजनात्मक खेळ, आध्यात्मिक दर्शन, सहली, योगाभ्यास असे एकापेक्षा एक सरस उपक्रम दर बुधवारी राबवत असते. ज्येष्ठांच्या कलागुणांना वाव देणारी ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संचलित बहि:शाल शिक्षण मंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यानमालेसह एकदिवसीय शिबिरे आयोजित करते.
संस्था दरवर्षी विविध संस्थांना सामाजिक बांधिलकीने जीवनोपयोगी साहित्य आणि आर्थिक मदत करून हातभार लावत असते. गतवर्षाप्रमाणे यंदाही संस्थेने पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीसह शालेय साहित्य प्रदान करत आपल्या दातृत्वाचे दर्शन घडवले.
स्वानंद संस्थेचे अध्यक्ष जयराम कुलकर्णी, उपाध्यक्ष सुनंदा गोसावी, आधारस्तंभ वसंतराव उपासनी, सचिव अविनाश गोसावी, खजिनदार शरद वैद्य, उपखजिनदार परमेश्वर चिंतकिंदी, कल्पना वैद्य, शालिनी डहाळे, सुधाकर सोनवणे, संजय हजिरनिस, जयंत देशपांडे, रवींद्र चंद्रात्रे, प्रज्ञा बेणारे, अनुराधा गोडसे, मालती शिंदीकर, वैदेही कुलकर्णी, ज्योती वाघमारे, अरुण देशपांडे, उषा देशपांडे, सतीश चितळे, सुधा डमरे, प्रा.प्रल्हाद वकारे, डॉ.कुसुम कुंटे, अविनाश कुलकर्णी, रमाकांत होनराव, अनिल सहस्त्रबुद्धे, रेखा नाशिककर, रेखा जहागीरदार यांसह सभासदांनी सहकार्य करत गरजूंच्या शिक्षणाला हातभार लावला. स्वानंद संस्थेने केलेल्या मदतीबद्दल नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक अरुण पगार, शिक्षक-कर्मचारीवृंद आणि विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.