नाशिक( प्रतिनिधी ):- शिक्षणात एखाद्या वेळी आलेल्या अपयशाने विद्यार्थ्यांनी खचून न जाता जोमाने अभ्यास करावा. निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून यशोशिखर प्राप्त करावे, असे प्रतिपादन कुंभमेळा प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे यांनी केले.
पुणे महामार्गावरील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मराठा समाज 'सय' सामाजिक आणि शैक्षणिक उन्नती मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात खडतर परिस्थितीवर मात करून अधिकारी बनलेले श्री.घोरपडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर संस्थापक अध्यक्ष विजय खैरे, अध्यक्ष विनायक सूर्यवंशी, उपाध्यक्ष रामनाथ म्हसके, खजिनदार यशवंतराव शिंदे, सचिव रवींद्र गायकवाड, सदस्या निर्मला सातभाई, रामदास वाजे आदी उपस्थित होते.
बालमंदिर ते पदवी आणि पदव्युत्तर गुणवत्ताप्राप्त गुणवंतांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेतील प्रियांका सूर्यवंशी, सीए श्वेता खांडे, एमबीबीएस पदवीप्राप्त डॉ.ओमकार शिंदे यांनाही गौरविण्यात आले. संस्थेच्या गुणगौरव आणि दिनदर्शिका उपक्रमासाठी देणगी देणाऱ्या देणगीदारांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यात आले. गुणवंतांच्या वतीने प्रियांका सूर्यवंशी यांनी सत्काराला उत्तर दिले. उपाध्यक्ष रामनाथ म्हसके यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार यशवंतराव शिंदे यांनी गुणवंत यादीचे वाचन केले. अध्यक्ष विनायक सूर्यवंशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रवींद्र गायकवाड यांनी आभार मानले. कृष्णा पोरजे यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.