
नाशिक:-( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याच्या यंदाच्या चौथीच्या कलाशिक्षण पाठ्यपुस्तकात दोन कविता समाविष्ट असलेले पाठ्यपुस्तकातील कवी सुप्रसिद्ध गीतकार राजेंद्र सोमवंशी यांच्या ‘चला खेळूया खेळ रे’ या कवितेचा गोवा राज्याच्या इयत्ता चौथीच्या ‘सुरंगी’ या पाठ्यपुस्तकात नुकताच समावेश करण्यात आल्याने त्यांच्यामुळे नाशिकच्या कवी आणि कवितेने अनोखे सीमोल्लंघन केले आहे. कवी राजेंद्र सोमवंशी हे दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संस्थेच्या निफाड इंग्लिश स्कूल या उपक्रमशील विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या २०२६-२७ या नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमात त्यांच्या ‘वासुदेव गीत’ आणि ‘शाळेला छान-छान बनवायचं…’ या दोन कवितांचा समावेश झाला आहे.

त्यानंतर गोवा राज्याच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश झाल्याने नाशिक जिल्ह्याच्या या सुपुत्राने बालसाहित्याच्या माध्यमातून आता राज्याची सीमा ओलांडली आहे. ‘चला खेळूया खेळ रे’ या कवितेच्या माध्यमामुळे मुलांच्या आरोग्याची गुरुकिल्ली नेमकी काय आहे ; हे समजावून सांगणारी आणि आरोग्यविषयक संदेश देणारी ही कविता गोवा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे केली आहे.

बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी यांचे ‘गम्माडी गम्मत’ आणि ‘गीत नवे गाऊ’ हे दोन बालकाव्यसंग्रह प्रकाशित झाले असून, चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘गीत नवे गाऊ’ या संग्रहाला मानाचे सहा पुरस्कार मिळाले असून दिल्ली येथे संपन्न झालेल्या ९८व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांनी उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

