
डाॅ.रमेश वरखेडे
नाशिक रोड ( प्रतिनिधी ) अभिजात मराठी भाषेला आपल्या लेखणीने समृद्ध करणारे आणि ज्यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली आहे, अशा अमृतमहोत्सवी साहित्यिकांचा सन्मान करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, महाराष्ट्र साहित्य परिषद-शाखा नाशिकरोड दर दोन वर्षांनी “ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मानोत्सव” हा कार्यक्रम आयोजित करते. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट २०२६ दिवशी, सायंकाळी सहा वाजता ऋतुरंग सभागृह, दत्त मंदिर चौक, नाशिक रोड येथे हा सोहळा होणार आहे. सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक तथा संपादक डॉ. रमेश वरखेडे उपस्थित राहणार आहेत. ख्यातनाम कवी तथा गीतकार मिलिंद गांधी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
डॉ.रमेश वरखेडे हे मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे विभागाचे संचालक होते. राज्य मराठी विकास संस्थेचे सदस्य, भाषा सल्लागार समितीचे सदस्य, साहित्य अकादमी अभ्यास मंडळाचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील ज्या साहित्यिकांचे वय पंच्याहत्तरपेक्षा जास्त असेल, आणि ज्यांचा यापूर्वी शाखेच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त सन्मान झाला नसेल, त्यांची माहिती उपाध्यक्ष रवींद्र मालुंजकर (९८५०८६६४८५) अथवा कार्यकारणी सदस्या अलका अमृतकर (९७३०००७९६९) यांच्याशी संपर्क करावा.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्यास जास्तीत जास्त साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष उन्मेष गायधनी, प्रमुख कार्यवाह शिवाजी म्हस्के, कार्यवाह रेखा पाटील, कोषाध्यक्ष दशरथ लोखंडे, अनिल गुरव, कामिनी तनपुरे, सुरेखा गणोरे, वृंदा देशमुख, कांचन पवार, दिनेश पैठणकर, प्रशांत कापसे आदींनी केले आहे.

