
नांदगाव( प्रतिनिधी ) कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगावच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना विभागा’च्या वतीने डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ व ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन व डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले.

सदर प्रसंगी मा.प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथांचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करून ‘आंतरराष्ट्रीय युवक दिना’च्या शुभेच्छा दिल्या.

‘आंतरराष्ट्रीय युवा दिना’च्या निमित्ताने नांदगाव ग्रामीण रुग्णालयाच्या दंतचिकित्सक डॉ. निष्मा आडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून तंबाखूजन्य व्यसनांमुळे होणाऱ्या आजारांची माहिती दिली तसेच मौखिक आरोग्य चांगले राखण्यासाठी तंबाखूजन्य व्यसनांपासून आजच्या युवापिढीने दूर राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा करण्यात आली.

वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आपले करिअर घडविण्यावर भर द्यावा असा मौलिक सल्ला दिला. व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी समाजात व्यापक जनजागृती करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी डॉ. दिपक जाधव यांनी ‘जागतिक युवा दिना’चे औचित्य साधून विविध दूर्धर आजार बाधित रुग्णांविषयी नैतिक सहानुभूती व संवेदना बाळगण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली.
सदर प्रसंगी मंचावर डॉ.एन.यु.पाटील, उपप्राचार्य डॉ.एस.ए. मराठे, विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ.सी.बी.निगळे, डॉ.निष्मा आडे, डॉ. रोशनी सुरवळकर,डॉ. दिपक जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे +2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एम.अहिरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,रा.से.यो. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.योगेश वाघ,रा.से.यो. +2 स्तर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.सी.पैठणकर व प्रा.श्रीमती एस.ए.लोखंडे व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

