
जव्हार (पालघर, प्रतिनिधी) जव्हार: देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिवस आज जिल्हा परिषद शाळा शिंदेपाडा (वावर-वांगणी) येथे मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शाळा परिसर तिरंगी पताकांनी आणि देशभक्तीपर घोषणांनी फुलून गेला होता.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रथम वंदे मातरम ने झाली. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी मानवंदना दिली.
ध्वजारोहणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर केले. स्वातंत्र्यलढ्यातील शहिदांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करण्यासाठी शेवटी सर्वांनी एकत्रितपणे तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना वावर-वांगणी ग्रामपंचायत यांच्या वतीने खाऊ म्हणून बुंदी वाटप करण्यात आली.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री. के. पी. जाधव यांनी स्वातंत्र्याचे महत्व आणि विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचे श्री. तुषार भोये यांनी आभार मानले.
कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳

