महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोड आयोजित ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मानोत्सव उपक्रम म्हणजे सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्याचा महत्त्वपूर्ण क्षण आहे. साहित्यातून गाव भेटतं, आई भेटते, सारी माणसं भेटतात. अंतर्मुख होऊन स्वतःच्या मनात आपण घुसतो आहोत. साहित्याच्या माध्यमातून जेन-झी बरोबरच जेन+अल्फा आणि जेन-बीटा आपल्याबरोबर आहेत, त्यामुळे आपण अधिक चिरतरुण होत आहोत. अशा चिरतरुण साहित्यिकांचा आपण सन्मान करत आहात, हे अतिशय महत्त्वाचं आहे" असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ. रमेश वरखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी मिलिंद गांधी यांनी डॉ. वरखेडे यांचा शाल स्मृतिचिन्ह ग्रंथभेट देऊन वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केल्या बद्दल सन्मान केला.
नाशिक ही दिग्दर्शनाची भूमी आहे. नाशिकरोड ही आत्मचिंतनाला दिशा देणारी भूमी आहे. तो मार्ग अधिक प्रशस्त होईल" असे डॉ. वरखेडे पुढे म्हणाले. यावेळी नाशिक जिल्ह्यातील ज्या लेखकांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली आहे, त्यांचा सन्मान डॉ. वरखेडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. दिलीप फडके, प्राचार्य डॉ. किशोर पवार, तु. सी. ढिकले, सी. एल. कुलकर्णी, रमेश डहाळे, डॉ. रामकृष्ण गवळीराम गायकवाड-लहवितकर महाराज, विमल बागडे, प्राचार्य डॉ. रावसाहेब शिंदे आदींचा सन्मान करण्यात आला
सत्काराला उत्तर देताना प्रा. दिलीप फडके म्हणाले की "साहित्यिक आणि व्यक्ती म्हणून तुम्ही माणसाशी कसे वागता, हे महत्त्वाचं असतं. मित्र म्हणून व्यक्त होऊन माणूस म्हणून जगावं". कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका अमृतकर यांनी केले. कवी प्रशांत केंदळे यांनी गायलेल्या स्वागत काव्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाखेचे उपाध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांनी प्रास्ताविक केले. गणपतराव मुठाळ यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सुमन हिरे यांनी आभार मानले आणि सुजाता येवले यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. उषा शिंदे, मंगला वरखेडे, वैद्य विक्रांत जाधव, बाळासाहेब गणोरे, संजय अमृतकर, प्रकाश पाटील, हेमंत देशमुख आदी उपस्थित होते.