
शेतीकाम, घरकाम करता, करता उत्स्फूर्तपणे ओव्या रचून मराठी व अहिराणी भाषेत कवितांची रचना करणार्या कवयित्री, निरक्षर असूनही जिवंत काव्यरचनेची प्रतिभा असलेल्या खान्देश रत्न बहिणाबाई चौधरी यांचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी असोदे जिल्हा जळगाव या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. बहिणाबाईंचा जन्म नागपंचमीच्या दिवशी महाजनांच्या घरी झाला. १८९३ मध्ये जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी बहिणाबाईंचा विवाह झाला. बहिणाबाईंना तीन अपत्ये झाली ओंकार, सोपान आणि काशी. वयाच्या तिसाव्या वर्षी (१९१०) बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या.
बहिणाबाई निरक्षर होत्या; तरिही त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तिथल्यातिथे सदर रचना उतरून घेतल्या आणि जपल्या. पुत्र सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर (३ डिसेंबर १९५१) लिहून घेतलेल्या कविता आचार्य अत्रे यांना दाखविल्या. अत्रे यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर एक वर्षाने, म्हणजेच १९५२ साली खानदेशातील सुप्रसिद्ध कवी बहिणाबाईंचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांनी आचार्य अत्रे यांच्या मदतीने "बहिणाबाईंची गाणी" हे पुस्तक प्रकाशित केले. ज्येष्ठ साहित्यिक प्र. के. अत्रे यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे.

● काव्य संग्रहाच्या प्रस्तावनेतून खुद्द अत्रे यांचे शब्द –
‘सोपानदेवांच्या मातोश्री, बहिणाबाई चौधरी या गेल्याच वर्षी (१९५१) वयाच्या बहात्तराव्या वर्षी मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी वीस-बावीस वर्षांची मैत्री आहे. पण त्यांच्या माजघरात सोन्याची खाण दडलेली असेल, याची मला माहिती नव्हती. त्यांना स्वतःला याची जाणीव असेल पण ते पडले मुलखाचे लाजाळू. त्यांना वाटले की खानदेशी वर्हाडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे ‘सुशिक्षित आणि सुसंस्कृत’ महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणास ठाऊक! म्हणून ते इतकी वर्षे तोंडात मूग धरून बसले. मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखविली’. त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि अधाशासारख्या सार्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, ‘अहो, हे बावनकशी सोने आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे’. त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करावयाचे आम्ही ठरविले.
बहिणाबाईंचे काव्य ‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता. बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले. आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचलेल्या त्यांच्या बर्याचशा कविता केवळ त्यांच्या निरक्षरतेमुळे त्यांच्याबरोबरच नाहीशा झाल्या आणि आपल्या माय मराठीचे अतोनात नुकसान झाले.
● बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोली भाषेत रचल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इत्यादी. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे; काही ओळखीची माणसे, असे आहेत.
● अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान काव्यातून व्यक्त करणारे होते. खानदेशातील आसोद हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी, अहिराणी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते
उदा. ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी’.
● तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार – जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.
● बहिणाबाई चौधरी यांच्या पवित्र स्मृतिस शतशः नमन…..
✍🏻शब्दांकन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, ९९२१९७६४२२

