
नाशिकरोड, (प्रतिनिधी ) दि. २४ ऑगस्ट :
क्रीडा भारती, नाशिक जिल्हा व्यापक बैठक पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिकरोड येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीस नाशिक जिल्ह्यातील सुमारे १५० हून अधिक पदाधिकारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत क्रीडा भारती नाशिकचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, क्रीडा भारतीच्या माध्यमातून येत्या १३ जुलै रोजी ‘पावनखिंड दौड’ आयोजित करण्यात येईल. तसेच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा व योग परिषदांचे आयोजन, दिव्यांग खेळाडू, ग्रामीण व आदिवासी भागातील क्रीडा गुणवत्तेचा शोध (टॅलेंट हंट) घेऊन त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा भारती कटिबद्ध राहील.

याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष विजय पुरंदरे यांनी क्रीडा भारतीचे ध्येय, कार्यप्रणाली व विविध उपक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रांत सहमंत्री श्रीमती अनुजा दाभाडे यांनी ‘क्रीडा ज्ञान परीक्षा २०२६’ च्या आयोजनाबाबत मार्गदर्शन केले. नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांनी क्रीडा क्षेत्रातील संघटनात्मक कार्याचे कौतुक करत पुढील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांचा गौरव
या सोहळ्यात विविध क्रीडा क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणारे खेळाडू व मार्गदर्शकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू व राज्य क्रीडा मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेती धावपटू संजीवनी जाधव, भूमिका नेहते, स्वयंम पाटील (स्विमिंग,डाऊन सिंड्रोम), सागर बोडके (अंध खेळाडू), अक्षय लिलके (कॅनोइंग), खंडू कोटकर (दिव्यांग खेळाडू), प्रणव दिघोळे (सिन्नर), कृष्ण लोहकरे, ओंकार बोडके. यांचा समावेश होता, तर क्रीडा मार्गदर्शक हेमंत पाटील, सिद्धार्थ वाघ, चंद्रकांत भाग्यवंत यांचा सत्कार करण्यात आला.या
कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष विनोदजी शिरभाते, क्रीडा केंद्र प्रमुख संजय पाटील, मातृशक्ती प्रमुख मंजिरी पाटे, युवाशक्ती प्रमुख पवन खोडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शैलजा जैन, निवृत्त विंग कमांडर प्रदीप बागमार, ग्रामीण क्रीडा भारती नाशिकचे अध्यक्ष विकास लाटे, नाशिक मंत्री दादा देशमुख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
याशिवाय क्रीडा भारती नाशिकचे उपाध्यक्ष चंद्रकांत भाग्यवंत, जे. पी. पवार, सीए निलेश कोचर, शैलजा जैन; सहमंत्री गीता चित्ते, सचिन मते; कोषाध्यक्ष सुरेखा पाटील; सदस्य आनंद ठाकूर, संतोष भालेराव; प्रसिद्धीप्रमुख अक्षय पाटे यांच्यासह विविध क्रीडा केंद्रांचे प्रमुख (पंचवटी – पवन खोडे, सिडको – अभिजीत देशमुख, गोविंदनगर/इंदिरानगर – सुनील दवंगे, जुने नाशिक – युवराज शेलार, नाशिकरोड – योगेश शेरमाळे, आडगाव – मेघनाथ माळोदे) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. मंजिरी पाटे यांनी केले. समारोपाच्या सत्रात उपस्थितांच्या विविध प्रश्नांवर खुली चर्चा झाली. शेवटी संजय पाटील यांनी आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

