
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुरस्कार विजेते क्रीडा संघटक रवींद्र मोरे, रामदास होते, विजय खरोटे, रमेश वझे आणि किशोर शिरसाठ.
नाशिक (प्रतिनिधी): यशवंत व्यायामशाळा आणि यशविद्या फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टेबल टेनिस प्रशिक्षक तथा क्रीडा संघटक शशांक वझे यांच्या
पुढाकाराने यशवंत व्यायाम शाळेत राष्ट्रीय खेळाडू तथा क्रीडा संघटकांना मान्यवरांच्या हस्ते क्रीडा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
गत १६ वर्षांपासून दरवर्षी क्रीडा क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान देणारे राष्ट्रीय खेळाडू , प्रशिक्षक , मार्गदर्शक , संघटक यांचा सन्मान केला जातो .
यावर्षी रामदास होते ( राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक , संघटक), विजय खरोटे ( राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक ,संघटक ) ,
किशोर शिरसाठ(राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक, संघटक), रमेश वझे (राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू, संघटक), रवींद्र मोरे ( राष्ट्रीय कुस्ती खेळाडू , संघटक) या सन्माननीय क्रीडा प्रशिक्षक व संघटकांचा छत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे , अविनाश खैरनार यांच्या हस्ते तर क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे, रवींद्र मेतकर, उदय खरे , कार्यक्रमाचे आयोजक टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांचा फोटो व माहिती असलेले सन्मानपत्र , शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले .
यावेळी रविंद मोरे यांनी मनोगत व्यक्त करतांना आपल्या शालेय जीवनापासून ते आतापर्यंतचा क्रीडा क्षेत्रातला आपला प्रवास नमूद केला. तर रामदास होते यांनी क्रीडा प्रशिक्षक व संघटकांनी शालेय स्तरावरील खेळाडूंसाठी प्रशिक्षक व संघटक व क्रीडा संस्थांनी जास्तीत जास्त खेळांचे शिबीर आणि स्पर्धांचे आयोजन केले पाहिजे असे आपल्या मनोगतात सांगितले. आनंद खरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल माहिती दिली व सन्माननीय प्रशिक्षक व क्रीडा संघटकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच गत १६ वर्षांपासून नियमित आयोजित होत असलेल्या क्रीडा दिनाच्या अत्यंत उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. उदय खरे यांनी सूत्रसंचालन केले व आयोजक शशांक वझे यांनी आभार मानले .यावेळी खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

