
नाशिक ..( प्रतिनिधी ) शब्दांची आतषबाजी, भावनांचा कल्लोळ आणि टाळ्यांचा गजर… असा काव्यमय माहोल आज नाशिकच्या आजीचे पुस्तकाचे हॉटेल येथे अनुभवायला मिळाला. अमरावतीच्या नामांकित बहुउद्देशीय संस्थेने आयोजित केलेल्या चौथ्या राज्यस्तरीय कवी संमेलनाने नाशिककर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ६० हून अधिक नवोदित आणि नामवंत कवींनी या संमेलनात हजेरी लावत आपल्या साहित्याचा ठेवा रसिकांसमोर मांडला.
या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे भूषण, राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित आदर्श शिक्षक, सुप्रसिद्ध व्याख्याते आणि ‘उठा, तुम्हीही जिंकणारच’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या प्रेरणादायी ग्रंथाचे लेखक श्री. अशोक कुमावत होते.

कवींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,आज फेसबुकवर कविता लिहिणारे लाखो आहेत, पण लोकांच्या हृदयावर कोरली जाणारी कविता लिहिणारे हाताच्या बोटावर आहेत. कविता ही प्रयोगशाळेत बनत नाही, ती जीवनाच्या संघर्षातून जन्म घेते.
कविता कशी असावी, याचे सर्मपक उदाहरण देत ते म्हणाले . कवितेला गंध असावा मातीचा शब्दांना धार असावी तलवारीची आणि आशयाला उंची असावी आकाशाची, तरच ती कविता इतिहासात अमर होते.
त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.या संमेलनाचे उद्घाटन खानदेश प्रसिद्ध समाजसेविका,अभिनेत्री सुप्रिया आहेर यांनी केले,प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक श्री. सुहास टिपरे ,महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या भीमाबाई जोंधळे ,संभाजीनगर येथील सेलिब्रिटी पौर्णिमा झाल्टे,समाजसेविका ज्योती आहेर, प्रसिद्ध निवेदिका कांचन जाधव ,सागर निकाळे आदी उपस्थित होते.श्री. सुहास टिपरे यांनी काव्याचे महत्त्व विषद करून कविता ऱ्हुदयातून यायला हवी असे सांगितले.
कवयित्री अश्विनी सांगळे यांनी आपल्या खुमासदार आणि ओघवत्या सूत्रसंचालनाने संपूर्ण कार्यक्रमात उत्साह टिकवून ठेवला. या भव्य सोहळ्याचे नेटके आयोजन युवा आयोजक भूषण सरदार यांनी केले होते.यावेळी व्यासपीठावर समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना समाज वैभव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट कविता सादर करणाऱ्या विजेत्या कवींना सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी सर्व कवींनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.काव्य, सन्मान आणि प्रेरणा यांचा त्रिवेणी संगम ठरलेल्या या संमेलनाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

