
नाशिकरोड: पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिक रोड येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थी कुमार अथर्व संदीप सरोदे यास त्याच्या उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती, विविध स्पर्धांमधील उल्लेखनीय यश, संस्कारशील व्यक्तिमत्त्व, प्रामाणिकपणा व सर्वांगीण गुणवत्तेची दखल घेऊन ‘आदर्श पुरुषोत्तम विद्यार्थी’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
अभ्यासाबरोबरच अथर्वने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेची प्रथम फेरी यशस्वीरीत्या पार करून दुसऱ्या फेरीसाठी पात्रता मिळविली होती. तसेच इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नाशिक जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून त्याने आपल्या गुणवत्तेची चमक दाखविली होती.
पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी कोल्हापूर येथील प्रतिथयश आर्किटेक्ट अनिरुद्ध देशपांडे यांनी त्यांना तत्कालीन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या नावे व त्यांच्या हस्ते शाळेतील इयत्ता नववी व दहावीमधील प्रत्येक विषयात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रुपये १००१/- चे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर संपूर्ण शाळेमधून सर्वांगीण गुणवत्ता, शैक्षणिक प्रगती, संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा व विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी या निकषांच्या आधारे एका विद्यार्थ्याची निवड करून त्यास ‘आदर्श पुरुषोत्तम विद्यार्थी’ हा विशेष पुरस्कार अथर्व संदीप सरोदे या विद्यार्थ्यास प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार संस्थेचे सेक्रेटरी राहुल मुळे शाळा समिती अध्यक्ष रावसाहेब गायधनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्राचार्य उमाकांत वाकलकर उपमुख्याध्यापक संजय पाटील पर्यवेक्षक डॉ. गजानन होडे श्रावण सूर्यवंशी माजी विद्यार्थी अनिरुद्ध देशपांडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन भरत भालेराव यांनी केले.

