
बोयगाव, ( प्रतिनिधी ): जनता विद्यालय बोयगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
शिक्षक दिनानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एक आगळावेगळा उपक्रम राबविला. शालेय तासिकांचे नियोजन करून विद्यार्थ्यांनीच विविध वर्गांमध्ये अध्ययन-अध्यापनाची जबाबदारी पार पाडली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्याची आणि जबाबदारीची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.

यावेळी इयत्ता १० वीची विद्यार्थिनी कु. गायत्री नवनाथ कुणगर हिने मुख्याध्यापक पदाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. आपल्या मनोगतात तिने सांगितले की, “मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळणे हे खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे काम आहे. विद्यालयातील विविध कामे सांभाळून मुख्याध्यापक श्री. काटवाणी ए. आर. हे ज्या पद्धतीने काम करतात, त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.” तिच्या या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षक व मुख्याध्यापकांच्या कार्याची जाणीव झाली.
या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका जबाबदारीने पार पाडत अध्यापनाचा आनंद घेतला. या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. काटवाणी ए. आर. तसेच उपशिक्षक श्री. विसपुते पी. ए. व श्री. हिरे आर. पी. यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कु.साक्षी नाईकवाडे, कु.गायत्री कुणगर, रिंकू जगताप, निलम नाईकवाडे, जितेंद्र नाईकवाडे यांनी आपले भाषण व मनोगत व्यक्त करताना अध्यापन करताना वर्गातील मुलांना शिकवताना किती कौशल्य लागते यावर विचार मांडले, तर काही विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय भाषणातून करून दिला.
श्री.हिरे सर, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. विद्या मॅडम, श्री. विसपुते सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. काटवाणी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रसंगी श्री.विसपुते सर यांनी कवितेच्या माध्यमाने शिक्षकांचा कार्यप्रवास मांडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, नियोजनकौशल्य आणि जबाबदारीची भावना विकसित करण्याच्या दृष्टीने हा शिक्षक दिनाचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यालयाच्या विद्यार्थिनी साक्षी नाईकवाडे, अस्मिता कोल्हे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.हिरे सर यांनी मानले या कार्यक्रमा वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

