
नांदगाव (प्रतिनिधी ) टोलनाक्यावरील व्यवस्थापन बदलल्याने नियमही बदलले असा अजब प्रकार चांदवड टोलनाक्यावर घडत असून त्यामुळे असंख्य वाहनधारकांनी तक्रारी केल्या आहेत नागरिकांना अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड न करता प्रचलित पद्धतीने मासिक शुल्क आकारून सवलतीच्या दरात प्रवास करता यावा ह्या करिता टोल प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील (मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्ग ६०) चांडवड येथील टोल नाका या प्रकल्पाची मूळ जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण च्या अंतर्गत ‘इरकॉन सोमा’ कडे होती, सध्या या टोल प्लाझावरील टोल वसुलीचे व्यवस्थापन व संचालन रिद्धिसिद्धी या कंपनीकडे सोपवण्यात आले आहे.सदरील टोलनाका सुरू झाल्यापासून नांदगाव आणि मनमाड परिसरातील खाजगी वाहनधारकांना मासिक शुल्क आकारून सवलतीच्या दरात प्रवास करता येत होता,परंतु व्यवस्थापन बदलल्याने नियम ही बदलले असा अजब प्रकार घडला असून वाहनधारकांना नाहक भुर्दंड बसत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या ‘राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निश्चिती आणि संकलन) नियम,२००८ च्या नियम ९ अंतर्गत स्थानिक रहिवाशांना सवलत दिली जाते.त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर स्थानिक नागरिकांच्या वाहनांसाठी टोल दरात विशेष कायदेशीर सवलती आणि नियमांची तरतूद करण्यात आली आहे.सबब टोल नाका व्यवस्थापनाने ह्या संदर्भात मागील प्रचलित पद्धत लागू करत वाहनधारकांना दिलासा द्यावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

