
नांदगाव | दि. ५ सप्टेंबर २०२६
नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व शाळेचे दैनंदिन कामकाज विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नेटकेपणाने सांभाळले.
शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाचे नियोजन स्कूलचे प्राचार्य श्री. मणी चावला सर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी चिरायू कासलीवाल व संस्कृती बोरसे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राहुल आहेर सर यांनी स्व. किशोर बागले सर यांच्या आठवणींना शब्दसुमनांनी उजाळा देत त्यांच्या कार्याचे व व्यक्तिमत्त्वाचे भावपूर्ण स्मरण केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. विजयजी चोपडा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, क. मा. कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनाही कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘ओळखा पाहू’, विविध संगीतमय खेळ आणि मनोरंजक उपक्रमांचा समावेश होता. शिक्षकांनीही या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. विविध खेळांमध्ये विजयी झालेल्या शिक्षकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना विविध ‘अवॉर्ड्स’ देऊन विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांविषयी असलेली कृतज्ञता, आदर आणि प्रेम व्यक्त केले. इयत्ता तिसरी, चौथा,आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुंदर समूह नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. विशेष आकर्षण ठरलेल्या या नृत्याद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांची वैशिष्ट्यपूर्ण आणि मनमोहक ओळख करून दिली.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री. सुनीलकुमार कासलीवाल, सेक्रेटरी श्री. विजय चोपडा, सौ. प्रमिलाताई कासलीवाल, सुशिलभाऊ कासलीवाल, जुगलकिशोरजी अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, प्राचार्य मणी चावला, मुख्याध्यापक विशाल सावंत व गोरख डफाळ यांनी सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनी अलिझा पठाण, ऋग्वेदा रावंदरे, संस्कृती बोरसे तसेच विद्यार्थी लव्य कासलीवाल यांनी केले. तर रिया गंगवाल व आर्या पगार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका अत्यंत जबाबदारीने पार पाडत शिक्षक दिनाला दिलेला अनोखा आणि संस्मरणीय सन्मान हा कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. उत्साह, कृतज्ञता आणि आदरभावनेने भरलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण आनंदमय झाले.

