
मालेगाव (वार्ताहर) अमेरिकेतील शिकागो सर्वधर्म परिषदेत विवेकानंदांनी विश्वबंधुत्वाचा शंखनाद केला. त्यांनी वसुधैव कुटुंबकम्चा संदेश देत जगाला विश्वबंधुत्वाचा, विश्वधर्माची शिकवण दिली, त्यांचा संदेश म्हणजे या महान राष्ट्राने आपल्या ध्येयाप्रती टाकलेले पहिले पाऊल आहे. असे प्रतिपादन नाशिक विवेकानंद केंद्राचे माजी नगरप्रमुख तथा उपक्रमशील प्रा. अमोल अहिरे यांनी केले. ते येथील झुं. प. काकाणी, रु. झ. काकाणी कन्या विद्यालय व रा. क. काकाणी कनिष्ठ महाविद्यालयात विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती कालिंदी हिगे उपस्थित होत्या. समवेत प्राचार्या शुभांगी अस्मर, मुख्याध्यापिका किरण टिपरे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. अहिरे म्हणालेत, महापुरुषांचे जीवन कथनासाठी नसून ते अनुकरणासाठी असते, मनुष्य निर्माणासाठी विवेकानंदांची वृत्ती अंगी बाणवली तर जीवन सफलतेकडून सार्थकतेकडे परावर्तित होऊन राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेला चालना मिळेल. विवेक विचारांतून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून जीवन एक साधना व्हावी असा संकल्प करावा. सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी मन, मनगट आणि मस्तिष्क/मेंदू यांचा योग्य समन्वय साधला पाहिजे. एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे. युवकांनी विवेकानंदांच्या साहित्याचा अधिकाधिक अभ्यास करून त्यांच्या विचारांचे अनुसरण करावे असे आवाहन प्रसंगी प्रा. अहिरे यांनी केले. भाषणाच्या प्रारंभी प्रा. अहिरे यांनी उपस्थितांकडून तीन ओमकार, ध्यान व शांतीपाठ करुन घेतला. विद्यालयात विवेकानंदांच्या शिकागो येथील भाषणाची हस्ताक्षर स्पर्धा व पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. प्रसंगी अंशुमन साकला याने मराठीतून तर कुमारी मृणाल पाटेकर हिने इंग्रजी भाषेतून विवेकानंदांच्या मुखोद्गत भाषणाचे सादरीकरण केले. प्रास्ताविक प्राचार्य अस्मर यांनी केले, परिचय प्रमोद देवरे यांनी करुन दिला. सूत्रसंचलान विजय येवले यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिक टिपरे यांनी मानलेत.

