
नाशिक दिनांक ११ सप्टेंबर : यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे दिनांक १६ ते १८ सप्टेंबर, २०२६ दरम्यान खुल्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत १४ वर्षे मुले आणि मुली, १७ वर्षे मुले आणि मुली आणि १९ वर्षे मुले आणि मुली अश्या तीन गटांचा समावेश आहे. हे या स्पर्धेचे ३८ वे वर्ष असून विविध गटातील खेळाडूंना स्पर्धेचा सराव मिळावा आणि या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळात प्रगती साधावी हा या स्पर्धा आयोजनामागील हेतू आहे. खेळाडूंना जास्तीत जास्त सामने खेळायला मिळावे यासाठी या स्पर्धा साखळी पद्दतीने खेळविण्यात येतात. या स्पर्धेमुळे नाशिक जिल्ह्याच्या खेळाडूंना त्यांच्या शालेय स्पर्धेसाठी उपयोग झालेला असून आपले खेळाडू राज्य स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहेत. या स्पर्धा विविध वयोगटाच्या असल्यामुळे मा. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी निश्चित केलेली जन्म तारीख प्रत्येक गटासाठी ग्राह्य धरली जाईल. ज्या संघांना सहभाग नोंदवायचा आहे त्या संघांनी उमेश सेनभक्त मो. क्र. ९८६००००४९३, अथवा अविनाश खैरनार मो. क्र. ९९२१८८८१०२ यांच्याशी संपर्क करावा.
या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, खजिनदार विजय खरोटे, व्हॉलीबॉल प्रशिक्षक आनंद खरे आणि अविनाश खैरनार यांनी केले आहे.

