
लेखक:- भास्कर कदम
मैत्रीचा कारवां बढता-बनता चला !
माणूस जीवनात मजल-दरमजल करत वाटचाल करीत असतो. त्यातूनच स्थित्यंतर-स्थलांतर घडत असते; काही ठरवून केलेले तर काही निमीत्तकारणाने केलेले असते. कधी ते कायमस्वरूपी तर कधी हंगामी असते. माझंही असंच काही झालं आहे. नांदगावहून नाशिक असे हंगामी स्थलांतर झालं आहे. कधी नांदगाव तर कधी नाशिक अशी ये-जा सुरू आहे. या प्रवासात-प्रवाहात जुने मित्र कायम आहे, तर काही नव्याने जोडली जात आहे.
नांदगावचा मित्र परिवार आजही कायम आहे. ही नाळ मी किंवा माझ्या मित्रांनी आजही तोडलेली नाही. ‘मी तसा ते’ असं हे अतूट नातं आहे. आपल्याशी माणसं जोडली जातात त्याला आपला तसाच समोरच्याचा स्वभाव-हेतू कारणीभूत असतो. कधीकधी हेतू असतोच असे नाही; परंतु स्वभाव हा मुख्य घटक आहे, असे मी मानतो.
नाशिकला आलो. नव्याने मित्र परिवारात भर पडली. यात काही सामाजिक क्षेत्रातील आहेत. काही लेखक-कवी अशी साहित्य क्षेत्रातील आहे. काही कला-सांस्कृतिक क्षेत्रातील आहे. पत्रकारिता हे माझे मूळ असल्याने त्यातूनच राजकारणात चंचूप्रवेश झाल्याने ओघानेच या दोन्ही क्षेत्रातील मंडळी माझ्याशी जोडली गेली आहे.
नाशिकलाही मोठा मित्र परिवार जमला. अशाच मित्र परिवारातील नाशिकचे माजी नगरसेवक सुनील खोडे व त्यांच्या विद्यमान नगरसेविका सुविद्य पत्नी सौ. सुप्रियाताई खोडे यांचा परिचय झाला. अल्पावधीतच ते कौटुंबिक स्नेही झाले. खोडे कंपनीचे वैशिष्ट्ये असे की, त्यांचा स्वभावात बडेजाव किंवा अहंकार नाही, हा माझा अनुभव आहे. माझी व त्यांची विचारधारा भिन्न; परंतु त्याची बाधा मैत्रीत आली नाही, आजतागायत जाणवलीही नाही.
इंदिरानगर परिसराचे प्रतिनिधित्व खोडे कुटुंब करतात. माझ्याशीच नव्हेतर सर्व सामान्य माणसाशी ते अदबीने वागतात, कदाचित हेच त्यांचे राजकीय बलस्थान असावे, असे माझे मत आहे. गणेशोस्तवाच्या निमित्ताने अनेकांसोबत माझीही भेट झाली. त्यांनी इतरांशी माझी ओळख हे नांदगावचे माजी नगराध्यक्ष अशी नेहमीप्रमाणे करून दिली, फोटोतही जवळ उभे केले, हा त्यांचा मोठेपणा. अशाप्रकारे माझ्या ‘मैत्रीचा कारवां बनता-बढता’ चला है. थोडं आपल्यावर थोडं समोरच्यावर हे अवलंबून असते हेच खरे.
- भास्कर कदम नांदगावकर.

