
बोयगाव 🙁 प्रतिनिधी ) जनता विद्यालय बोयगाव येथे एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आज विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार प्राप्त इंडियन हायस्कूल, मनमाड येथील कला शिक्षक श्री. राजेश देविदास पाटील (आर. डी.) यांनी विद्यार्थ्यांना चित्रकला विषयातील विविध बारकावे, तंत्रे तसेच परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. राजेश पाटील सर यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला विषयाबद्दल अधिक गोडी व रुची निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेत विविध कलात्मक बाबी आत्मसात केल्या.
राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री. काटवाणी ए. आर. यांच्या हस्ते श्री. राजेश पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन छोटेखानी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे उपशिक्षक श्री विसपुते पी ए यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेच्या तयारीसाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि चित्रकलेविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली.

