
ध्येय मोठे ठेवा जिद्द आणि चिकाटी सोडू नका. कष्टात सातत्य ठेवा त्यातूनच यशाचे आभाळ आपण निर्माण करू शकतो. यश असतेच यश मिळतेच फक्त त्यासाठी पाठलाग हवा तोच पाठलाग आपण विद्यार्थी दशेत केला पाहिजे असे विचार व्याख्याते डॉ .मोहन माळी यांनी मांडले.

पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी येथे आयोजित मी बदलणारच या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव तथा बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी -श्री एस. बी. देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष टी के रेवगडे तर मुख्याध्यापक श्री आर. टी. गिरी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की जीवनाचे दोन बिंदू निश्चित केले पाहिजे एक म्हणजे मी आता कुठे आहे आणि दुसरा बिंदू म्हणजे माझं अंतिम ध्येय काय? हे निश्चित असले पाहिजे तरच कष्टातून यशाचं आभाळ निर्माण करण्याची प्रेरणा मिळते यावेळी त्यांनी कष्टातून आयएएस झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची उदाहरणे देत संघर्षातूनच यश निर्माण करू शकतो असा मंत्रच त्यांनी विद्यार्थ्यांना दिला अन् स्वप्न तुम्हाला कष्टाची जाणीव करून देतात म्हणून विद्यार्थी दशेतच स्वप्न पाहायला शिका असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा सन्मान करण्यात आला. तर विद्यार्थी दशेतच ध्येय निश्चित असले पाहिजे. स्वप्न बघा पण त्या स्वप्नांचा पाठलाग करायला शिका असे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एस. बी. देशमुख यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सविता देशमुख यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक श्री. आर. टी. गिरी यांनी मानले.

