
‘पुस्तकावर बोलू काही…’ उपक्रमात प्रतिपादन
नाशिक : इंग्रजी माध्यमांच्या शाळाच्या इतिहासाकडे पाहण्याच्या उदासिनतेमुळे देशाचा स्वाभिमानी व तेजस्वी इतिहास लुप्त होतो की काय अशी भिती व अवस्था निर्माण झाली आहे, त्यामुळे साहित्यिकांनी देशाचा जाज्जवल्य इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडावा असे प्रतिपादन युवासाहित्यिक संजय धनगर यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठान, नाशिकच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित 'पुस्तकावर बोलू काही...!' या उपक्रमात त्यांच्यासह अर्जुन वेलजाळी यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या *शौर्योदगारांचा इतिहास* या साहित्यकृतीवर हुतात्मा स्मारकात श्रोत्यांशी 'ऐसपैस गप्पां'द्वारे संवाद साधताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजेंद्र देसले होते.
पुढे त्यांनी देशाच्या गाळीव इतिहासातील काही तेजस्वी ऐतिहासिक घटनांचा आढावा घेऊन त्याद्वारे विद्यार्थ्यांना इतिहास वाचनाकडे वळवता येईल व देशाप्रति आपले कर्तव्य करण्याचा संदेश देता येईल असेही सांगितले. त्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळाशाळांतून प्रयत्न झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
सुनंदाताई पाटील आणि अशोक दुधारे या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. अशोक पाटील यांनी आभार मानले तर अशोक कुमावत यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान, येत्या मंगळवारी ( दि. २२ सप्टेंबर २०२६ ) अनिल मनोहर हे 'मनोहरवाडी ' या साहित्यकृतीवर आपले विचार मांडणार आहेत.

