
लासलगाव (१९ सप्टेंबर):
येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व वाणिज्य मंडळाच्या वतीने बी.कॉम. विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आयोजित या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सी.ए. रोहित वाळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वीरेंद्र आहेर यांनी केले.
यावेळी सी.ए. रोहित वाळके यांनी विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट (CA) होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक वाटचाल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असलेल्या विविध शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील (PSU) रोजगाराच्या संधी, त्यासाठी आवश्यक पात्रता, तयारी व करिअर नियोजन याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणासोबतच भविष्यातील करिअरच्या संधींचा विचार करून योग्य दिशेने तयारी करावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सृष्टी थोरात यांनी केले, तर डॉ. वीरेंद्र आहेर यांनी आभार प्रदर्शन केले.
संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. गोविंदराव होळकर व प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभाग व वाणिज्य मंडळाच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना CA तसेच विविध शासकीय व PSU क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती मिळाल्याने कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व उपयुक्त ठरली.

