
मुंबई : ( प्रतिनिधी ) गेल्या पंचवीस वर्षांच्या जलरंगप्रवासात आपल्या स्वतंत्र चित्रभाषेची ओळख निर्माण करणारे नाशिकचे चित्रकार अशोक ढिवरे यांच्या चित्रांचे ‘Elsewhere’ (इतरत्र)हे एकल प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी. रोड, काळा घोडा, फोर्ट येथे २२ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची वेळ दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ अशी आहे.
आज प्रदर्शन उद्घाटनाला चित्रकार राजेंद्र पाटील, चित्रकार अनिल नाईक, सुरेंद्र जगताप, दत्तात्रय पाडेकर आदी मान्यवर चित्रकारांनी भेट दिली.
अशोक ढिवरे यांच्या ‘Elsewhere’ या प्रदर्शनातील चित्रांकडे केवळ भूदृश्य म्हणून पाहता येत नाही. त्यांच्या जलरंगांतून दिसणारे प्रदेश हे प्रत्यक्ष भूगोलापेक्षा स्मृती, अनुभव, आभास आणि अंतर्मनाच्या प्रदेशांशी अधिक जवळचे वाटतात. एखाद्या ठिकाणाची धूसर आठवण, पाहिलेल्या दृश्याचा मनात उरलेला भास आणि त्या दृश्याभोवती पसरलेले निःशब्द अंतर, त्यांच्या चित्रांमधून सूक्ष्मपणे व्यक्त होते.

नकाशावर कुठेही न सापडणारी, तरीही पाहताना विलक्षण ओळखीची वाटणारी काही भूदृश्ये त्यांच्या चित्रांत दिसतात. अर्धवट जाणवणाऱ्या आकृती, धूसर होत जाणाऱ्या रेषा, दूर क्षितिजाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा आणि प्रकाश-सावल्यांच्या मधोमध निर्माण होणारी एक अनाम शांतता, हे ‘Elsewhere’च्या चित्रविश्वाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. जलरंगाचे पारदर्शक माध्यम वापरताना ढिवरे रंगांना केवळ दृश्यनिर्मितीचे साधन न ठेवता आठवणी आणि भावानुभव व्यक्त करणारे माध्यम बनवतात.
आपल्या मनातली एखादी जुनी आठवण हा प्रश्न ही चित्रे उपस्थित करतात. त्यामुळे ‘Elsewhere’मधील ‘दुसरीकडे’ ही संकल्पना एखाद्या भौगोलिक ठिकाणापुरती मर्यादित राहत नाही; ती आपल्या आत उघडणाऱ्या एका अदृश्य खिडकीचे रूप घेते.
गेल्या पंचवीस वर्षांच्या कलासाधनेतून आलेली परिपक्वता, जलरंगातील पारदर्शकतेची जाण आणि दृश्यापलीकडील अनुभव पकडण्याची संवेदनशीलता या प्रदर्शनातून प्रत्ययास येते. त्यामुळे ‘Elsewhere’ हे केवळ चित्रांचे प्रदर्शन न राहता दृश्य, स्मृती आणि मौन यांच्या सीमारेषेवरचा एक अंतर्मुख कलाप्रवास ठरतो.
रसिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन अशोक ढिवरे यांच्या जलरंगांतून उलगडणाऱ्या या वेगळ्या, धूसर आणि तरीही आतून ओळखीच्या वाटणाऱ्या प्रदेशाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

