
लासलगाव, (प्रतिनिधी ) : माहितीचा अधिकार हा केवळ माहिती मिळविण्याचा अधिकार नसून प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकशाही बळकट करणारे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन प्रा. किशोर गोसावी यांनी केले. लासलगाव महाविद्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला सरकारी कार्यालये, संस्था आणि सार्वजनिक प्राधिकरणांकडील माहिती मागण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. या अधिकाराचा योग्य व जबाबदारीने वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी माहिती अधिकार कायद्याची मूलभूत माहिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे प्रा. गोसावी यांनी सांगितले.

सरकारी निर्णय व योजनांची माहिती मिळविणे, सार्वजनिक निधीचा वापर जाणून घेणे तसेच प्रशासनाकडून विविध प्रश्नांची उत्तरे मागणे नागरिकांना माहितीच्या अधिकारामुळे शक्य होते. त्यामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. माहिती मिळविताना योग्य प्रश्न विचारणे, अधिकृत स्रोत तपासणे आणि प्राप्त माहितीचा जबाबदारीने वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुनिल गायकर यांनी केले तर प्रा.उज्वल शेलार यांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकार दिनानिमित्त शपथ दिली.

“माहिती जाणून घ्या, अधिकार समजून घ्या आणि जबाबदारीने वापरा; कारण जागरूक नागरिकांमुळेच लोकशाही अधिक सक्षम होते,” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

