
सातारा (प्रतिनिधी) दिनांक ६ ऑक्टोबर : सातारा येथे दिनांक१ ते ५ ऑक्टोबर, २०२६ दरम्यान वरिष्ठ गटाच्या योनेक्स-सनराईज बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात नाशिकच्या प्रज्वल सोनावणे याने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदक पटकावले. वरिष्ठ गटात सुवर्णपदक मिळविणारा प्रज्वल हा पहिला खेळाडू ठरला आहे.
या स्पर्धेत प्रज्वलला सहावे मानांकन मिळाले होते. त्याने उपांत्यपूर्ण फेरीत चवथे मानांकन असलेल्या ठाणेच्या ओम गोवंडी याला १५-०७ आणि १५- १२ असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर झालेल्या उपांत्य फेरीत प्रज्वलने लातूरच्या नागेश चाम्बले याचा १५-१२ आणि १५-०६ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचा अंतिम सामना मूळचा साताराचा परंतु सध्या ठाणे येथे सराव करत असलेल्या सर्वेश यादव याच्याविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात चांगलीच चुरस बघायला मिळाली.

पहिल्या सेटमध्ये १३-१३ अश्या बरोबरीनंतर १५-१५ अशी बरोबरी झाली. परंतु महत्वाच्या अंतिम क्षणी प्रज्वलने संयमाने खेळ करत सलग दोन गुण वसूल करून पहिला सेट १७-१५ असा जिंकून आघाडी मिळविली. दुसरा सेटही अत्यंत चुरशीचा झाला. १४-१४ अश्या बरोबरीनंतर प्रज्वलने पुन्हा एकदा शांत डोक्याने खेळत सलग दोन गुण मिळवण्यात यश प्राप्त केले. आणि हा दुसरा सेटही १६-१४ असा जिंकून या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले.
ज्वलने वयाच्या पाच वर्षांपासून बॅडमिंटन प्रशिक्षक मकरंद देव यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव सिरी केला होता. पाच वर्षे सराव केल्यानंतर त्यांच्या खेळामध्ये आणखी चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी यासाठी प्रज्वल सध्या बेंगलोर येथे प्रकाश पदुकोण यांच्या बॅडमिंटन अकादमी येथे कसून सराव करत आहे, प्रज्वल याने विविध वयोगटाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतही विजेतेपद मिळविले आहे. जर्मनमध्ये आयोजित स्पर्धेत प्रज्वलन १७ वर्षे गटात विजेतेपद मिळविले होते, तर डेन्मार्कमध्ये आयोजित स्पर्धेत १७ वर्षे गटात उपविजेतेपद मिळविले होते. याचप्रमाणे भारतातील राष्ट्रीय स्पर्धेत १८ वर्षे गटात विजेतेपद मिळविले आहे. तसेच अनेक राज्य स्पर्धेत आणि राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळविली आहेत अशी माहिती प्रशिक्षक मकरंद देव यांनी दिली. प्रज्वलने आता वरिष्ठ गटात खेळतांना विजेतेपद मिळवून आपल्या पुढील कारकिर्दीच्या वाटचालीला योग्य सुरवात केली आहे असेही मकरंद देव यांनी सांगितले.

