नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणाऱ्या मोजक्या मावळ्यांना सोबतीला घेऊन, तुटपुंज्या शस्र-साधन सामुग्रीच्या जोरावर महाराष्ट्रातील जनतेच्या मनात देव, देश आणि जन्मभूमीबद्दल प्रेम व स्वराज्याबद्दल अस्मिता जागवून जुलमी मुस्लिम सत्ताधीशांच्या विरुद्ध लढून महाराष्ट्रातील जनतेचे स्वराज्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्थापन केले. महाराष्ट्रातील सामान्य जनता, गरीब शेतकरी आणि विशेषतः स्रिया, माताभगिनी यांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी स्वराज्य चालवले; मात्र आजच्या स्वातंत्र्याच्या वातावरणात समाज दिवसेंदिवस मतलबी होत चालला असून समाज, राजकारणी आणि अगदी तरुणाईही छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग, आदर्श आणि स्वराज्याची शिकवण विसरून भरकटत चालला अशी खंत शिवशाहीर सोपान वाटपाडे यांनी व्यक्त केली.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' या उपक्रमात 'जनकल्याण राजा : छत्रपती शिवराय' या ऐतिहासिक साहित्यकृतीवर हुतात्मा स्मारकात श्रोत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक मा. अरुण घोडेराव हे अध्यक्षस्थानी होते.
पुढे ते म्हणाले की, राजे शहाजी भोसले यांच्या प्रेरणेने आणि राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाने स्थापन केलेले स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या कल्याणासाठी चालवले. तसेच त्यांनी स्वराज्य स्थापनेच्या प्रवासातील अनेक शौर्यपूर्ण, पराक्रमी घटनांचा चिकित्सक मागोवाही घेतला.
नीलकंठ पाटील आणि अशोक पाटील या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. अशोक कुमावत यांनी आभार तर मधुकर गिरी यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान, येत्या शुक्रवारी ( दि. ९ ऑक्टोबर २०२६ ) पंडितराव देशमुख हे 'हेमाडी उपाख्य हेमाद्रीपंत : चिकित्सक अभ्यास' या साहित्यकृतीवर आपले विचार मांडणार आहेत.