
नांदगाव, दि. 15 ऑक्टोबर 2026 :
नांदगाव येथील सौ. क. मा. कासलीवाल माध्यमिक विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सहभागातून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ व विशाल सावंत यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. पुस्तकांशी मैत्री करा, वाचनाची आवड जोपासा आणि ज्ञानाच्या माध्यमातून प्रगती साधा, असा संदेश या ग्रंथदिंडीतून देण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी स्वयंम साळुंखे व रेहान शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील शिक्षक शरद पवार यांनी ‘यशस्वी जीवनासाठी वाचनाचे महत्त्व’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाचनामुळे ज्ञानात भर पडते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ यांनी विद्यार्थ्यांना डॉ. ए. पी. जे. कलाम यांचा जीवनपरिचय करून दिला. डॉ. कलाम यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून संघर्ष करत स्वतःला सिद्ध केले. त्यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, तसेच देशभक्ती, प्रामाणिकपणा आणि जिद्द हे गुण आत्मसात करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ, विशाल सावंत यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले, तर संजय शिवदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

