
बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर-मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्रातील ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी सात विद्यार्थ्यांनी ‘सुपर ६०’ मध्ये स्थान मिळवून राज्याचा गौरव वाढविला. विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यातील न्यू इंग्लिश स्कूल, चांदगाव येथील विद्यार्थिनी श्रद्धा रमेश लोंढे हिने ‘एआय बेस्ड टीचर असिस्टंट फॉर ब्लाइंड्स’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत विशेष सुवर्णपदक मिळविले.
१२ ते १४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित या स्पर्धेत देशभरातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी विज्ञानाधारित प्रकल्प सादर केले. यामध्ये श्रद्धा लोंढेसह राजवर्धन प्रदीप काळे, देविका सुहास ताड, अर्णव भुसारी, गीता गणपत धनवडे, शांभवी रामनप्पा अजगुंडे आणि विराज संदीप शिंदे या सात विद्यार्थ्यांनी ‘सुपर ६०’ मध्ये स्थान मिळविले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शालेय शिक्षणमंत्री ना. श्री. दादाजी भुसे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश अभिमानास्पद असून, कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या समाजोपयोगी नवकल्पना कौतुकास्पद आहेत. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संशोधनाला राज्य शासनाकडून सदैव प्रोत्साहन दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या स्पर्धेतील उत्कृष्ट ६० विद्यार्थ्यांना ‘साकुरा विज्ञान विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत’ जपान भेटीची संधी मिळू शकते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था आणि आधुनिक वैज्ञानिक वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल वैज्ञानिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

