ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत शाळेला ग्रंथपेटी भेट; विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचा उपक्रम

नाशिक ( प्रतिनिधी) : एल. बी. आर. फाउंडेशन, नवीन सिडको, नाशिक संचलित द ग्रोइंग ट्री प्ले अँड प्री स्कूल येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकांशी मैत्री व्हावी आणि वाचनातून ज्ञान, कल्पनाशक्ती व विचारशक्ती विकसित व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. कलाम यांचे जीवन, त्यांचे विचार, शिक्षणाविषयीची तळमळ आणि विद्यार्थ्यांना दिलेली स्वप्न पाहण्याची प्रेरणा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
आजच्या डिजिटल आणि सोशल मीडिया युगात पुस्तक वाचनाचे महत्त्व अधिक अधोरेखित करताना शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा रोकडे यांनी सांगितले की, “वाचनामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढते, शब्दसंपत्ती समृद्ध होते, कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि विचार करण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय आणि पुस्तकांशी मैत्री निर्माण करणे गरजेचे आहे.”
‘ग्रंथ तुमच्या दारी’मधून ज्ञानाची शाळेपर्यंत वाटचाल आणि वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत शाळेला ग्रंथपेटी भेट देण्यात आली. प्रतिष्ठानतर्फे श्री. विनायक रानडे यांनी ग्रंथपेटी शाळेला प्रदान केली. यावेळी शाळेचे संचालक योगेश रोकडे उपस्थित होते.
श्री. रानडे यांनी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, गेल्या १६ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू असून आजपर्यंत सुमारे ४ कोटी २५ लाख रुपयांची ग्रंथसंपदा, २ हजार ग्रंथपेट्या, १ लाख पुस्तके, ३५ हजार वाचक, ६५०० लेखक आणि ९०० प्रकाशक या वाचन चळवळीशी जोडले गेले आहेत. भारतासह भारताबाहेरील १५ देशांमध्ये तसेच महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्वासा, तामिळनाडू आणि कर्नाटक आदी राज्यांमध्ये या उपक्रमाचा विस्तार झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
द ग्रोइंग ट्री प्ले अँड प्री स्कूलतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सामाजिक व अनुभवाधारित उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. द ड्रॉइंग ट्री प्लान प्री स्कूल च्या नवीन सिडको, औदुंबर बस स्टॉप परिसरातील विद्यार्थ्यांना वाचनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रंथपेटी देताना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि परिसरातील वाचकांनी या ग्रंथपेटीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रत्यक्ष अनुभवातून आनंददायी शिक्षण ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून द ग्रोइंग ट्री प्ले अँड प्री स्कूलतर्फे वर्षभर विविध सण, उत्सव, राष्ट्रीय दिन, सामाजिक व शैक्षणिक दिनविशेष तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जातात. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता वाचन, संस्कार, सर्जनशीलता, सामाजिक जाणीव, प्रत्यक्ष अनुभव आणि आनंददायी शिक्षणातून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर शाळेचा भर आहे.
या प्रसंगी उपमुख्याध्यापिका आरती रोकडे, कोऑर्डिनेटर रश्मी आहेर, स्वाती पाल, प्रियांका शिंदे, प्रतीक्षा पवार, सुरक्षा सूर्यवंशी, नूतन बागुल तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत द ग्रोइंग ट्री प्ले अँड प्री स्कूलला ग्रंथपेटी भेट देताना स्वीकारताना विद्यार्थी व मुख्याध्यापिका प्रतिभा रोकडे, उपमुख्याध्यापिका आरती रोकडे, कोऑर्डिनेटर रेशमी आहेर, प्रियंका शिंदे, स्वाती पाल ,प्रतीक्षा पवार, सुरक्षा सूर्यवंशी, नूतन बागुल आदी

