
जळगाव निंबायती (वार्ताहर) विद्यार्थ्यांनी केवळ सर्वाधिक गुण मिळवण्याच्या उद्देशाने नव्हे तर ज्ञानार्जनासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सचोटी, अभ्यासात सातत्य असणे आवश्यक असून परीक्षेत यश मिळविण्याचा गैरमार्ग हा कोणालाही ध्येयापर्यंत पोहोचवू शकत नाही असे प्रतिपादन वक्ते व सामाजिक कार्यकर्ते सतीश कलंत्री यांनी केले.

येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण मंडळाच्या अभियानांतर्गत आयोजित कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा या उपक्रमात ते बोलत होते. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉपीमुक्त परीक्षा व गैरमार्गाला आळा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्यु. काॅलेज विभाग प्रमुख प्रा. एस. टी. जाधव होते. समवेत प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे होते. समवेत प्राचार्य व्ही. डी. काळे, पर्यवेक्षक डी. के. जगताप, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कलंत्री म्हणाले अंतःकरण शुद्ध असेल तर आनंद स्वरुप जीवनाची अनुभूती घेता येईल, विद्यार्थी दशेतील संस्कार भविष्य घडवतात. कष्टातून व प्रामाणिकपणे यश मिळविणाऱ्या विविध गुणवंतांची यशोगाथा मांडून त्यांनी विद्यार्थ्यांना आवांतर वाचन करण्याचे आवाहन केले. परिचय प्रा. अमोल अहिरे यांनी करुन दिला. सूत्रसंचलान प्रा. सी. डी. राजपूत यांनी केले तर आभार प्रा. दीपक बोरसे यांनी मानलेत.

