
!! निद्रेचे अंतरंग!!
कवी -वाळू आहेर इंजिनिअर,नाशिक
रात्र हळू हळू धरेवर उतरते
दिनाचा गलबला हळू विरते
विचारांचे पाखरू घरट्यात परते
निद्रेचे गूढ द्वार मग उघडते||१||
मी ,माझे स्वप्नचि तिथे विरते
पद, पैसा, चिंता मागे उरते
रिक्त हाताने जीव आत सारते
त्या कृपेपुढे शीश सहज झुकते||२||
श्वासाची लय कुणीतरी राखते
हृदयाची स्पंदने कुणी जपते
नकळत मम कृपा मज सांभाळते
हाच विश्वास जीवास झोपू देते||३||
ध्यानात जे साधकास मिळते
निद्रेत तेच सहजपणे घडते
ना सुख उरते, ना दुःख उरते
फक्त शुद्ध अस्तित्व मागे उरते||४||
रात्र म्हणजे छोटा मृत्यू वाटते
पहाट म्हणजे नवा जन्म लाभते
सोडण्यातच खरे सुख वसते
हे गुज निद्रेच्या दारी उलगडते||५||

