
नांदगाव | प्रतिनिधी
नांदगाव व मनमाड मतदारसंघातील नगरपरिषद शिक्षण मंडळ तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकारातून मोफत दप्तर व चार मोठ्या स्केचर वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ होणार असून पालकांनाही आर्थिक दिलासा मिळणार आहे.
या उपक्रमांतर्गत मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शालेय दप्तर व चार मोठ्या स्केचर वह्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संबंधित शाळांमार्फत लवकरच या साहित्याचे वितरण करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळावी, कोणताही विद्यार्थी शैक्षणिक साहित्याअभावी मागे राहू नये आणि पालकांवरील शैक्षणिक खर्चाचा भार कमी व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.
या अभिनव शैक्षणिक उपक्रमाबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनांनी समाधान व्यक्त करत आमदार सुहास कांदे यांचे आभार मानले आहेत

