
वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी :
“ये भी दिन चले जायेंगे…” हे चार शब्द केवळ सायकल आणि मोटारसायकलवर लिहिलेले एक वाक्य नव्हते, तर संपूर्ण आयुष्याकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन होता. सुखाचे दिवस असोत किंवा दुःखाचे, यश असो किंवा अपयश, परिस्थिती कितीही कठीण असो, एक दिवस ती बदलणारच, हा आशावादी संदेश आपल्या जगण्यातून देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिवंगत महेबूब चांद शेख गुरुजी!
विडी कामगार म्हणून कष्टमय जीवनाची सुरुवात करून आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि शिक्षणावरील निष्ठेच्या बळावर जिल्हा परिषद शाळेचे आदर्श मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळविणाऱ्या शेख गुरुजींचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांच्या चाळिसाव्या निमित्त होणाऱ्या विधीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांच्या संघर्षमय आणि कर्तृत्ववान जीवनाचा मागोवा घेणे उचित ठरेल.
शेख गुरुजी हे केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान देणारे शिक्षक नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे संस्कारक्षम मार्गदर्शक होते. विद्यार्थ्यांना प्रेमाने समजावून सांगणे, प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेणे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी आपुलकीने वागणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा, परिश्रम, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची मूल्ये रुजविली. त्यांच्या सहवासात शिकलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या यशातच शिक्षकाचे खरे यश असते, या भावनेतून त्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले.
सोनांबे पंचक्रोशीतील नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांची बदली पुन्हा गावाजवळील सोनारी येथे करण्यात आली. विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा आणि गावकऱ्यांचे त्यांच्यावरील प्रेम याचे हे प्रतीक होते. सन २००३ मध्ये ते जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक पदावरून सन्मानाने सेवानिवृत्त झाले. मात्र सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे शिक्षणक्षेत्राशी आणि समाजाशी असलेले नाते कायम राहिले.
शेख गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वांत वेगळी आणि लक्षवेधी बाब म्हणजे त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन. त्यांच्या सायकलवर आणि मोटारसायकलवर ‘ये भी दिन चले जायेंगे’ हे वाक्य लिहिलेले असायचे.
या चार शब्दांत जीवनाचे मोठे तत्त्वज्ञान सामावलेले आहे. आयुष्यात कितीही संकटे आली, परिस्थिती प्रतिकूल झाली, दुःखाचे डोंगर कोसळले तरी खचून जायचे नाही. कारण सुख आणि दुःख दोन्हीही कायमस्वरूपी नसतात. काळ बदलत असतो आणि परिस्थितीही बदलत असते. त्यामुळे संयम, धैर्य आणि आशावाद सोडायचा नाही, हा संदेश गुरुजी आपल्या कृतीतून देत असत.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात त्यांचा हा विचार प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. त्यांनी हे वाक्य केवळ वाहनांवर लिहिले नव्हते, तर आपल्या जगण्याचा तो मूलमंत्र बनविला होता.
वयाच्या ८४व्या वर्षी वृद्धापकाळाने शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सोनांबे येथे शेख गुरुजींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सोनांबे गावाने एक ज्येष्ठ मार्गदर्शक, शिक्षणक्षेत्राने एक निष्ठावान शिक्षक आणि परिवाराने प्रेमळ आधारवड गमावला.
शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांच्या चाळिसाव्या निमित्त विधी होत असताना त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
शेख गुरुजी आज आपल्यात नाहीत; मात्र त्यांनी घडविलेले विद्यार्थी, त्यांनी जोडलेली माणसे, त्यांनी रुजविलेले संस्कार आणि त्यांनी दिलेला सकारात्मक विचार यांमधून ते सदैव जिवंत राहतील.
विडी कामगार ते मुख्याध्यापक हा त्यांचा प्रवास केवळ एका व्यक्तीचा जीवनप्रवास नाही, तर कष्ट, जिद्द, शिक्षणनिष्ठा आणि माणुसकीच्या बळावर माणूस किती मोठा होऊ शकतो, याचा वस्तुपाठ आहे.
त्यांच्या सायकलवर आणि मोटारसायकलवर झळकणारे ते शब्द आज त्यांच्या आठवणींच्या रूपाने प्रत्येकाच्या मनात कोरले गेले आहेत…
“ये भी दिन चले जायेंगे…”
गुरुजी, तुमचा हा विचार पुढील अनेक पिढ्यांना जगण्याचे बळ देत राहील. तुमच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि शेख परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना!
सोनांबे ग्रामपंचायत, सोनांबे सार्वजनिक वाचनालय, देवनदी खोरे पतसंस्था, गोवर्धन पतसंस्था, आझाद पतसंस्था, महामित्र परिवार, राष्ट्रसेवा दल, साहित्य रसास्वाद, गुरुजींचा शिक्षक मित्र परिवार, शिक्षक संघ , शिक्षक समिती या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !
शब्दांकन वसंत गोसावी, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा पाटोळे, ता. सिन्नर.

